अवैध बांधकामांचा अहवाल सादर
By admin | Published: May 8, 2015 05:24 AM2015-05-08T05:24:37+5:302015-05-08T05:24:37+5:30
महापालिकेने १ एप्रिलपासून कारवाई करून अद्यापपर्यंत २७९ अनधिकृत बांधकामे पाडली. आरसीसी बांधकामे, पत्राशेड अशी मिळून विविध भागांतील २ लाख ७९ हजार ५०० चौरस फुटांची
पिंपरी : महापालिकेने १ एप्रिलपासून कारवाई करून अद्यापपर्यंत २७९ अनधिकृत बांधकामे पाडली. आरसीसी बांधकामे, पत्राशेड अशी मिळून विविध भागांतील २ लाख ७९ हजार ५०० चौरस फुटांची ही बांधकामे आहेत. याबाबतचा अहवाल महापालिकेने उच्च न्यायालयाला गुरुवारी सादर केला आहे.
उच्च न्यायालयाने सुरुवातीला अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, असे आदेश दिले होते. परंतु, महापालिकेकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याच्या तक्रारी याचिकाकर्त्यांकडून होऊ लागल्या. त्यामुळे महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई काय केली? याचा अहवाल वेळोवेळी सादर करावा, असे न्यायालयाने सुचविले. त्यामुळे महापालिकेला कारवाई करून अहवाल सादर करणे बंधनकारक झाले आहे. त्यानुसार महापालिकेने १ एप्रिलपासून अनधिकृत बांधकामा विरुद्धची विशेष मोहीम राबवून सुमारे ३०० बांधकामांवर कारवाई केल्याचा अहवाल सादर केला. काळेवाडी, रहाटणी, वाल्हेकरवाडी, मामुर्डी, आकुर्डी, मोहननगर, सांगवी, चक्रपाणी वसाहत (भोसरी), नढेनगर, वाकड या भागाचा समावेश आहे. (प्रतिनिधी)