युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा यांना अन् भरपूर मोबदला मिळवा; महिलेला साडेपाच लाखांचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Published: December 4, 2023 04:22 PM2023-12-04T16:22:56+5:302023-12-04T16:23:30+5:30
सुरुवातीला काही प्रमाणात मोबदला देऊन महिलेचा विश्वास संपादन केला
पुणे: युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करून चांगला पैसे मिळेल असे सांगून एका महिलेची फसवणूक केल्याच्या प्रकार उंड्री परिसरात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ३१ ऑक्टोबर २०२३ ते १ सप्टेंबर २०२३ यादरम्यान घडला आहे. याप्रकरणी उंड्री परिसरात राहणाऱ्या एका ३३ वर्षीय महिलेने पोलिसांत फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटल्यानुसार, तक्रारदार यांना अज्ञात मोबाइल क्रमांकावरून मेसेज आला. युट्युब चॅनेलला सबस्क्राईब केल्यास चांगला परतावा मिळेल. असे आमिष दाखवून महिलेला टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांना वेगवेगळे टास्क करण्यासाठी दिले. सुरुवातीला काही प्रमाणात मोबदला देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून महिलेला ५ लाख ४९ हजार रुपये गुंतवण्यास भाग पाडले. मिळालेला नफा दिसत होता मात्र प्रत्यक्षात पैसे काढण्यासाठी गेले असता पैसे निघत नसल्याने त्यांनी विचारणा केली. त्यावेळी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यांना ग्रुपमधून काढून टाकण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.