उपनगरातील हद्दीवाढीच्या समस्या
By Admin | Published: May 17, 2014 07:52 PM2014-05-17T19:52:13+5:302014-05-17T21:47:31+5:30
अर्धवट भागात गटारीची कामे गेल्या कित्येक महिन्यापासून अर्धवट अवस्थेत आहेत. येथील स्मशानभूमीचा रस्त्या अभावी वापर बंद आहे.
रस्त्याअभावी स्मशानभूमीचा वापर नाही
मेडद । दि.१७ (वार्ताहर)
बारामती शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या खंडोबानगर भागात वर्ष होऊन विविध कामे प्रलंबित आहेत. अर्धवट भागात गटारीची कामे गेल्या कित्येक महिन्यापासून अर्धवट अवस्थेत आहेत. येथील स्मशानभूमीचा रस्त्या अभावी वापर बंद आहे.
या भागातील स्मशानभूमी बांधून ८ ते ९ वर्ष झाले पण रस्ता नसल्याने ती वापराविना धूळ खात पडली आहे. असे अनेक समस्याने या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. वर्षानुवर्ष हेच जीवन अंगवळणी पडलेले हतबल नागरिक नरकातील जीवन जगत आहेत.
बारामती नगरपालिकेत गेल्यावर तरी या समस्या सुटतील, असे या भागातील नागरिकांमध्ये वाटत होते. पण आजही भुयारी गटारीची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. गटारीसाठी खोदलेली चारी गेल्या कित्येक महिन्यापासून न बुजविल्याने त्यात कचरा साठल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याच चारीत डुकरे चरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबत अवस्था अतिशय दयनिय झाली आहे. भूयारी गटारीची कामे पूर्ण करण्यासाठी दुर्लक्ष करण्यात आले आहे.
खंडोबानगर परिसरातील कर्हा नदीच्या किनार्यावर ८ ते ९ वर्ष होऊन गेली स्मशानभूमी बांधण्यात आली आहे. परंतु, या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने वापराविना पडून आहे. रस्त्याअभावी तिचा वापर अंत्यसंस्कारासाठी करता येत नाही. लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या स्मशानभूमीत मोकाट कुत्री व जनावरांचा वावर असतो. त्यामुळे या भागातील नागरिकांना उघड्यावरच अंत्यविधी करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करून देखील प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. नगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर देखील हे प्रश्न जैसे थे आहे. स्मशानभूमीच्या सभोवताली कचरा साठला आहे. मोठे खड्डे पडले आहेत. या स्मशानभूमीची स्वच्छता करून लाईट, रस्त्याची व पाण्याची सोय करून द्यावी. अंत्यविधीसाठी होणारी गैरसोय दूर करावी, अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे.