उपनगरांना पुणे महापालिका झाली नकोशी; फुरसुंगीला दिली, तर आम्हालाही द्या नगरपालिका!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 01:02 PM2023-04-05T13:02:23+5:302023-04-05T13:03:05+5:30
दोन वर्षांपूर्वी नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना दोन वर्षांत मूलभूत सुविधा पुरविण्यात महापालिकेला अपयश
दीपक होमकर
पुणे : फुरसुंगी, उरुळी देवाची या उपनगरांना महापालिकेतून वगळून त्यांच्यासाठी स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने दिला. त्यानंतर आता पुण्याच्या पूर्व भागासाठी स्वतंत्र हडपसर महापालिकेच्या मागणीने जोर धरला आहे. तर शिवणे , उत्तमनगर, कोपरे, कोंढवे धावडे येथील गावांसाठी सुद्धा स्वतंत्र नगर परिषदेच्या मागणीसाठी गावकऱ्यांच्या बैठका झडत आहेत. तिकडे चंदननगर वाघोली आणि दोन वर्षांपूर्वीच महापालिकेत समाविष्ट झालेल्या नऱ्हे, खडकवासला परिसरांचाही अद्याप पाणी प्रश्न न सोडविता आल्याने महापालिका नकोच या मागणीने जोर धरला आहे.
पूर्वी दर दहा वर्षांनी पुणे महापालिकेची हद्द वाढत होती. महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारली की नव्या दहा ते वीस गावांचा समावेश महापालिकेत व्हायचा असा अलीकडच्या काळातील इतिहास आहे. त्यात तीन वर्षांपूर्वी महापालिकेने तब्बल २३ गावांचा समावेश महापालिकेत केला आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे महापालिका सर्वांत मोठी महापालिका झाली. खडकवासला, जांभूळवाडी, वाघोली, कोळेवाडी, म्हाळुंगे, सूस, वडाचीवाडी, किरकटवाडी, शेवाळेवाडी, कोंढवे धावडे, कोपरे, नऱ्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी,नांदोशी, भिलारेवाडी, सणसनगर, मांगडेवाडी, पिसोळी, गुजर निंबाळकरवाडी, नांदेड, बावधन (बुद्रुक) आणि मांजरी (बु.) या गावांचा समावेश झाला. त्यामुळे वाढतच चाललेल्या महापालिकेतून वेगळी झालेले फुरसुंगी नगरपरिषद म्हणजे या पुणे महापालिकेला मोठा ब्रेक लागला आहे. दोन वर्षांपूर्वी नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना दोन वर्षांत मूलभूत सुविधा पुरविण्यात महापालिकेला अपयश आले तर दुसरीकडे या गावातील नागरिकांना मिळकत कर दुपटीने वाढला त्यामुळे सर्वसामान्यांना महापालिकेत येण्याचा फटकाच बसला होता.
एकूणच सध्या पुणे महापालिकेचा विस्तार पाहता आणि पेठेसह हद्दवाढ परिसरात होणारी विकासकामे पाहता महापालिका करण्याची मागणी जोर धरत आहे. पुणे महापालिकेमध्ये प्रशासकीय कारभार सुरु होऊन वर्ष उलटले अद्याप निवडणुका झाल्याच नाहीत. गेल्या वर्षभरात दोनवेळा निवडणुकांचे वारे वाहिले खरे; मात्र निवडणुका झाल्याच नाहीत. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अनेक इव्हेंटफुल कार्यक्रमांवर निर्बंध आले आणि दुसरीकडे प्रशासनाकडूनही गावातील विकासकामाकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्यामुळे या हद्दवाढ भागाला कोणी वाली राहिला नाही अशी अवस्था झाली आहे.
हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढतच गेली महापालिका
१९९७ साली पुणे महापालिकेत एकूण तब्बल ३८ गावांचा समावेश करण्यात आला होता. ज्यामुळे पुणे महापालिकेचे क्षेत्रफळ हे २५० चौरस किलोमीटर झाले. दहा वर्षांनी म्हणजे २०१७ साली पुन्हा एकदा ११ गावांचा समावेश महापालिकेत करण्यात आला तेव्हा महापालिकेचे क्षेत्रफळ हे ३३१.५७ चौरस किमी इतके झाले. त्यानंतर पुन्हा २३ गावांचा समावेश करण्यात आल्याने पुणे महापालिकेचे क्षेत्रफळ हे जवळजवळ ५१६ चौरस किलोमीटरपर्यंत (महसूल विभागाच्या अंदाजानुसार) जाऊन पोहोचले आहे. दोन वर्षांपूर्वी नव्याने समावेश करण्यात आलेल्या २३ गावांचे एकूण क्षेत्रफळ हे १८३ किमी असल्यामुळे पुणे महापालिकेने मुंबई महापालिकेलाही क्षेत्रफळाच्या दृष्टीने मागे टाकले.