उपनगराला अद्याप मंडईची प्रतीक्षाच!

By admin | Published: July 6, 2017 03:09 AM2017-07-06T03:09:34+5:302017-07-06T03:09:34+5:30

रावेत, वाल्हेकरवाडी या भागाचा महापालिकेत समावेश होऊन सुमारे २० वर्ष झाली. अनेक मूलभूत सुविधा पालिका प्रशासन पुरवीत

The suburbs still waiting for the market! | उपनगराला अद्याप मंडईची प्रतीक्षाच!

उपनगराला अद्याप मंडईची प्रतीक्षाच!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रावेत : रावेत, वाल्हेकरवाडी या भागाचा महापालिकेत समावेश होऊन सुमारे २० वर्ष झाली. अनेक मूलभूत सुविधा पालिका प्रशासन पुरवीत असताना भाजी मंडईबाबत प्रशासन मात्र उदासीन दिसून येते. परिसरात एकही अधिकृत भाजी मंडई नसल्यामुळे भाजी विक्रेत्यांना आपले ठाण रस्त्यावरच मांडून भाजी विक्री करावी लागत आहे. मागील अनेक वर्षांपासून असणारे चित्र केव्हा बदलणार व भाजी विक्रेत्यांना हक्काची भाजी मंडई केव्हा मिळणार, असा प्रश्न भाजी विक्रेत्यांसह नागरिकांना पडला आहे.

परिसरातील शैक्षणिक संकुल, गुरुद्वारा चौक, आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, संत नामदेव चौक आदी भागांत कोठेही भाजी मंडई नसल्यामुळे भाजी विक्रेते आपले बस्तान भर रस्त्यात मांडतात. त्यामुळे सायंकाळी या ठिकाणी नेहमी वाहतूककोंडी होते. या ठिकाणाहून विद्यार्थी जा-ये करीत असतात. त्यामुळे परिसरात सतत विद्यार्थी आणि नागरिकांची गर्दी नेहमी असते. भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावर दुकाने थाटल्यामुळे सर्वांना रस्ता शोधत जावे लागते़ या मार्गावर सतत वाहनांची गर्दी असते.
परिसरात रावेत प्राधिकरण येथे शनिवारी मैदानावर आठवडे बाजार भरतो़ या ठिकाणी शहर परिसरासह इतर ठिकाणांहून अनेक विक्रेते भाजी विक्रीसाठी येतात़ मैदान छोटे असल्यामुळे येथे सर्वच विक्रेत्यांना जागा मिळत नाही, त्यामुळे अनेक विक्रेते रस्त्यावर ठाण मांडून भाजी विक्री करतात़ या वेळी येथे जत्रेचे स्वरूप आलेले असते येथेही वाहतुकीचा खोळंबा होतो़ एका विक्रेत्याने सांगितले की, आम्हाला रस्त्यावर थांबून काही ठिकाणी दररोज भाजी विक्री करू दिली जात नाही जर दररोज भाजी विक्री करायची असेल तर स्थानिकांना पैसे द्यावे लागतात़

स्पाईन रोड बिजलीनगर
वाहतुकीचा परिसरातील सर्वात मोठा मार्ग म्हणून या मार्गाची ओळख आहे़ या मार्गावर रेल विहार वसाहती लगत असणाऱ्या मुख्य चौकात नेहमी नागरिक आणि वाहनांची गर्दी असल्यामुळे त्यातच रस्त्यावर भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहतुकीचा नेहमी खोळंबा होतो़ चौकातील वाहतूक नियंत्रण दिवे चालू असल्यामुळे वाहनांच्या रांगा लांबपर्यंत लागलेल्या असतात़ त्यातच रस्त्याच्या दुतर्फा हातगाडे उभे असल्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो़ पालिका प्रशासनाकडे तक्रार केल्यास अतिक्रमण विभाग काही तासापुरती कारवाई करते पुन्हा काही वेळाने परिसरात जैसे थे परिस्थिती पहावयास मिळते. तरी पालिका प्रशासनाने या भाजी विक्रेत्यांना मंडई उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजीविक्रेत्यांसह नागरिक करीत आहेत़
शिवाजी चौक, वाल्हेकरवाडी
हा येथील मुख्य चौक असून या चौकातून रावेत मार्गे अनेक वाहने द्रुतगती मार्गाकडे जाण्या येण्या करिता वापर करतात़ त्यामुळे येथे नेहमी वाहनांची गर्दी असते़ रस्त्यावर भाजी विक्रेते आपले हात गाडे बिनधास्तपणे उभे करतात, त्यामुळे येथील नेहमी वाहतुकीचा खोळंबा होतो. येथेच पालिकेची शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांची सतत गर्दी असते़ पालकांना आणि विद्यार्थ्यांना हातगाड्यामधून रस्ता शोधत शाळेत जावे यावे लागते.
गुरुद्वारा चौक
४हा चौक नेहमी गजबजलेला असतो़ चौकातून आकुर्डी रेल्वे स्टेशनकडे आणि वाल्हेकरवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक भाजी विक्रेते आपले हातगाडे उभे करून रस्ता अडवतात. हा मार्ग रस्ता दुभाजकामुळे अरुंद झाला आहे़ त्यातच रस्त्याच्या दुतर्फा हातगाडे उभे असल्यामुळे रस्ता शोधणेसुद्धा नागरिकांना शक्य होत नाही़ काही वेळा नागरिक या विक्रेत्यांना विनंती करण्यास गेल्यावर न ऐकता विक्रेते नागरिकांसोबत हुज्जत घालतात़ विशेषत: सायंकाळच्या वेळी येथे विक्रेत्यांची अधिक गर्दी असते.


सांगवीतील मंडई वापराविना धूळखात


लोकमत न्यूज नेटवर्क
सांगवी : सांगवी परिसरात स्वतंत्र भाजी मंडई नाही़ त्यामुळे
एकाच परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी आठवडे बाजार भारत असल्याने पालिका यातून काय साध्य करतेय, हा जनतेचा प्रश्न आहे.
कर संकलन सुविधा केंद्राशेजारी निर्माण केलेल्या राजीव गांधी भाजी मार्केट सध्या दारुडे, जुगार खेळणारे आणि भटक्या प्राण्याचे आश्रय स्थान बनले आहे़
पालिकेचे शेजारी कार्यालय आहे़ तरी ही अवस्था असल्याने जे आहे ते सांभाळले जात नसून नव्याकडे कधी लक्ष देणार, अशी परिस्थिती आहे. जुनी सांगवी आणि परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेने सहा ओट्यांचे भाजी मार्केट विकसित केले. परंतु, नागरिकांनीच ह्या भाजी मार्केटचा उपयोग नाकारून घेतल्याने आणि इथे भाजी घेण्यासाठी न येण्याच्या वृत्तीने पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मुख्य चौक आणि वर्दळीचा भाग सोडून ही भाजी मंडई असल्याने भाजी विक्रेत्यांनीही याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत.
नवी संगवीतील साई चौकात संध्याकाळच्या वेळी भरणारी मंडई हीच एकमेव भाजी मंडई परिसरात असून काही दिवसांपूर्वी सदाभाऊ खोत यांच्या हस्ते उद्घाटन झालेली भाजी मंडई बंद असून परिसरात पिंपळे गुरव, नवी सांगवी, जुनी सांगवी असे तीन आठवडे बाजार २ किलोमीटरच्या परिघात भरतात.

परिसरात भाजी मंडई असावी; पण आठवडे बाजारामध्ये भाजीचे दर कमी असतात. कारण थेट शेतकरी ते ग्राहक भाजी मिळते.
- वैजयंती सोनावणे, गृहिणी.

परिसरात भाजी मंडई होणे आवश्यक असून परिसरात सर्व सोयी झाल्या; पण पालिकेच्या मूलभूत गरजा देण्याकडे नियोजनाचा अभाव दिसून येतो.
- तुकाराम आरेकर, ज्येष्ठ नागरिक

भाजी मंडई गरजेची असून परिसरात नागरिक याकडे वळतील का हा प्रश्न आहे़ कारण हातगाडीवर भाजी घेणारे ग्राहक भाजी मंडईत भाजी घेतील शंका आहे. - सुरेश फडतरे, भाजी विक्रेता

Web Title: The suburbs still waiting for the market!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.