ठाकूर यांचा खून करून फरार झालेल्या आरोपीला पकडण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:08 AM2021-07-18T04:08:29+5:302021-07-18T04:08:29+5:30
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंचर शहरात अज्ञात कारणावरून गळफास देऊन कैलास सोमनाथ ठाकूर (वय ५0, रा. मंचर) याचा खून ...
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंचर शहरात अज्ञात कारणावरून गळफास देऊन कैलास सोमनाथ ठाकूर (वय ५0, रा. मंचर) याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी दीपक साळुंखे ऊर्फ फारुख याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मंचर शहरातील मुळेवाडी रस्ता येथे थोरात यांच्या मालकीच्या खोलीमध्ये दीपक साळुंखे ऊर्फ फारुक याने कैलास सोमनाथ ठाकूर याचा अज्ञात कारणावरून त्याच्या गळ्यास दोरीने गळफास देऊन खून केला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी दीपक साळुंखे ऊर्फ फारुख हा खून केल्यापासून फरार होता. या आरोपीचे पूर्ण नाव व मूळगाव याबाबत काही एक माहिती उपलब्ध नव्हती. तसेच तो दुहेरी नाव धारण करून राहत असल्याने सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणे पोलिसांना अवघड व किचकट झालेले होते. त्यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक नेमण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे हे पथक आरोपीचा शोध व तपास करत असताना पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली सदर गुन्ह्यातील आरोपी दीपक साळुंखे ऊर्फ फारुख हा गुन्हा केल्यापासून फरारी आहे व तो लोणावळा परिसरात असून तो मुंबई बाजुकडे पळून जाण्याच्या तयारीत आहे. पोलीस पथकाने लोणावळा शहरात सापळा रचला. आरोपी हा फिरस्ता असल्याने पोलिसांनी वेश बदलून तसेच कामगारांच्या वेशात आरोपीची माहिती काढली. मग लोणावळा शहरातून कामगार कट्टा एसटी स्टँड येथून संशयित व्यक्तीस ताब्यात घेतले. त्याचेकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव दीपक विष्णू साळुंखे ऊर्फ फारुख ऊर्फ काळू (वय ४२, मूळ रा. कांदिवली, मालाड वेस्ट, मुंबई सध्या रा. मुळेवाडी रस्ता, मंचर) असे सांगितले. त्यास ताब्यात घेऊन त्यांचेकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. आरोपीस मंचर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास मंचर पोलीस करत आहे. या आरोपीवर मुंबई येथे अनेक गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, नेताजी गंधारे, हनुमंत पासलकर, विक्रम तापकीर, दीपक साबळे, सचिन गायकवाड, वाघमारे, संदीप वारे, अक्षय नवले, नीलेश सुपेकर, अक्षय जावळे यांनी केली आहे.