जाधववाडीत बिबट्याला पकडण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:16 AM2021-02-26T04:16:34+5:302021-02-26T04:16:34+5:30
जाधववाडी शिवारातील शिवमळा रोडलगत असलेल्या उसाच्या शेतात बिबट्याचे वारंवार दर्शन होत होते. येथील ग्रामस्थांनी याबाबत वनविभागाला वेळोवेळी तक्रार केली ...
जाधववाडी शिवारातील शिवमळा रोडलगत असलेल्या उसाच्या शेतात बिबट्याचे वारंवार दर्शन होत होते. येथील ग्रामस्थांनी याबाबत वनविभागाला वेळोवेळी तक्रार केली होती. बिबट्यामुळे या भागात भीतीचे वातावरण पसरले होते. या ठिकाणी पाळीव प्राणी फस्त करण्याचा सपाटा बिबट्याने लावला होता. भागात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. त्या पिंजऱ्यात बुधवार (दि.२४) रोजी ४ ते ५ वर्षांचा बिबट्या जेरबंद झाला आहे. या बिबट्याची रवानगी माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात केल्याची माहिती माहिती वनरक्षक के. जी. भालेराव यांनी दिली.
पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या मादी असून या भागात अजून बिबटे असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील परिसरात उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असून घेतलेल्या उसाच्या पिकांमुळे बिबट्यांना लपण्यासाठी जागा मिळत आहे. यामुळे या भागात बिबट्याचा वावर जास्त प्रमाणात वाढला आहे. अनेक ठिकाणी उसामध्ये बिबट्याचे पायांचे ठसे दिसून आले आहे. या भागात ऊसतोडणी चालू झाल्याने बिबट्याला लपण राहिली नाही त्यामुळे बिबटे मानवी वस्तीकडे वळू लागले आहेत.
२५ बेल्हा बिबट्या
जाधववाडी (ता. जुन्नर) येथे पिंज-यात जेरबंद झालेला बिबट्या दिसत आहे.