‘नियोजनबद्ध अभ्यासाने स्पर्धा परीक्षेत यश शक्य’
By admin | Published: April 8, 2015 03:45 AM2015-04-08T03:45:33+5:302015-04-08T03:45:33+5:30
भोसरी-दिघी रस्त्यावरील राधाकृष्णनगरीजवळ साकोरे वास्तव्यास आहेत. त्यांचे वडील सहायक फौजदार असून, आई नीलिमा गृहिणी आहे
भोसरी-दिघी रस्त्यावरील राधाकृष्णनगरीजवळ साकोरे वास्तव्यास आहेत. त्यांचे वडील सहायक फौजदार असून, आई नीलिमा गृहिणी आहे, तर भाऊ स्वप्निल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. राज्य सेवा परीक्षेत उत्तुंग यश मिळविल्याचे वृत्त शहरात पसरल्याने विशाल यांच्यावर आज दिवसभर कौतुकाचा वर्षाव होत होता. विविध राजकीय पक्षांचे नेते, संघटनांच्या प्रतिनिधींनी घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. सायंकाळी सहाला साकोरे यांनी ‘लोकमत’च्या पिंपरी-चिंचवड विभागीय कार्यालयास भेट दिली. ‘लोकमत’ने पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. या वेळी साकोरे यांनी दिलेल्या विशेष मुलाखतीत यशाचा आलेख उलगडला. शालेय, माध्यमिक शिक्षण, स्पर्धा परीक्षेची तयारी, परीक्षेचे टप्पे, स्वरूप, यशासाठी वापरलेले तंत्र, केलेला अभ्यास याविषयी माहिती दिली. यशाचा कानमंत्र सांगितला.
स्पर्धा परीक्षेसाठी कुटुंबातून प्रोत्साहन होते का?
साकोरे : मी मूळचा पुणे जिल्ह्यातील केंदूर- पाबळचा. आमचे कुटुंब सध्या भोसरीत वास्तव्यास आहे. वडील पोलीस खात्यात नोकरीस आहेत. त्यामुळे मी आयएएस व्हावे, असे त्यांना नेहमी वाटायचे.
शिक्षण घेत असताना आईनेही मला स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहित केले. पाठबळ दिले. त्यामुळे माझाही कल स्पर्धा परीक्षेकडे होता. सुरुवातीपासूनच मी अभ्यासात हुशार होतो. चिंचवड येथील सी. के. गोयल शाळेतून दहावी झाली. दहावीत ९२.४० गुण मिळाले.
त्यानंतर पुण्यातील लक्ष्मणराव आपटे प्रशालेतून विज्ञान
शाखेत प्रवेश घेऊन अकरावी-
बारावी पूर्ण केली. त्यानंतर सर्वसाधारणपणे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सहभागी होणारी मुले बीएस्सी करून आलेली असतात. त्यामुळे मीही बीएस्सीला प्रवेश घेतला. पुढे विचार बदलला आणि पिंपरीतील डॉ. डी. वाय.
पाटील इंजिनिअरिंग कॉलेजला अॅडमिशन घेतले. इंजिनिअरिंग करण्याचा उद्देश असा होता की, जर स्पर्धा परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही, तर इंजिनिअर होऊन चरितार्थ चालविता येईल.
मॅकेनिक इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर दोन वर्षे म्हणजेच २००९पर्यंत गुडगाव येथे डेन्स या कंपनीत नोकरी केली. खासगी क्षेत्रात नोकरी करीत असताना आपण प्रशासकीय सेवेत जावे, याची पुन्हा जाणीव झाली. कारण, प्रशासकीय सेवेतून आपण लोकसेवा अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो, या विचाराने नोकरी सोडून २००९ला पुण्यात परतलो.
परीक्षेची तयारी कशी केली?
साकोरे : नोकरी करीत असताना मी प्रशासकीय सेवेत काम करावे म्हणून आईने प्रोत्साहन दिले. भावानेही पाठबळ दिले. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीत मी गेलो आणि यूपीएससीची तयारी करू लागलो. सलग पाच वर्षे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना जर सातत्याने अपयश आले, तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होत जातो. माझाही आत्मविश्वास ढळू नये म्हणून मी इतिहास विषयात एमएही केले. नेट परीक्षाही उत्तीर्ण झालो. मी जर स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालो नाही, तर कमीत कमी प्राध्यापक होईल, अशीही तयारी केली होती. आम्ही पाच जणांचा ग्रुप तयार केला आणि अभ्यासाचे नियोजन केले. आणि यश मिळाले. (प्रतिनिधी)