नगदवाडीच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:10 AM2021-04-06T04:10:48+5:302021-04-06T04:10:48+5:30
नगदवाडी येथील सुखदेव विठोबा जगताप यांच्या गट नंबर ५३९ मधील विहिरीमध्ये रविवारी (दि. ४) रात्री बिबट्या पडला. सोमवारी (दि.५) ...
नगदवाडी येथील सुखदेव विठोबा जगताप यांच्या गट नंबर ५३९ मधील विहिरीमध्ये रविवारी (दि. ४) रात्री बिबट्या पडला. सोमवारी (दि.५) सकाळी विहिरीतून काहीतरी आवाज येत असल्याने जगताप यांनी विहिरीमध्ये डोकावून पाहिले असता विहिरीत बिबट्या पडलेला असल्याचे लक्षात आले . त्यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाचे पथकाने दुपारी १ वाजता या बिबट्याला सुखरूप बाहेर काढले. हा बिबट्या मादी जातीचा मादी असून ती सर्वसाधारणपणे ७ ते ८ वर्षे वयाची पूर्ण वाढ झालेली आहे. जगताप यांच्या विहिरीला कठडा नसल्याने भक्ष्याचा पाठलाग करत असताना हा बिबट्या विहिरीत पडला असावा असा अंदाज आहे.
नगदवाडी, कांदळी, वडगाव कांदळी या परिसरामध्ये नागरिकांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत असते. हा बिबट्या विहिरीतून सुखरुप बाहेर काढून पुढील वैद्यकीय उपचारासाठी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात नेण्यात आले आहे. या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वनपाल सचिन मोढवे, वनरक्षक अरुण देशमुख, कैलास भालेराव, वनसेवक नाथा भोर, बाळू वामन, किसन गुळवे व रेस्कु टीमचे अजिंक्य भालेराव या सर्वांनी मेहनत घेतली.