Pune | आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे बिबट्या जेरबंद करण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 07:01 PM2023-04-04T19:01:53+5:302023-04-04T19:03:00+5:30
पहाटेच्या दरम्यान या पिंजऱ्यात अंदाजे दोन ते तीन वर्ष वयाचा बिबट्या जेरबंद झाला...
अवसरी : आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे बाळू नाथा घुले या मेंढपाळावर झोपेत बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. त्या परिसरात वनखात्याने ग्रामस्थांच्या मागणीवरून पिंजरा लावला होता. मंगळवारी (दि. ४) पहाटेच्या दरम्यान या पिंजऱ्यात अंदाजे दोन ते तीन वर्ष वयाचा बिबट्या जेरबंद झाला आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी दिली.
पारगाव (ता. आंबेगाव) येथील पारगाव - जवळे रस्त्यावर बाळू नाथा घुले या मेंढपाळावर शेतात झोपला असताना बिबट्याने हल्ला केला होता. या घटनेनंतर परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली होती. नागरिकांनी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार वन खात्याने हल्ला झालेल्या घटनास्थळापासून थोड्या अंतरावर बढेकर वस्ती व ढोबळे वस्तीच्या दरम्यान संदीप कचरदास बढेकर यांच्या शेतात तीन दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. त्यात सावज ठेवण्यात आले होते. मंगळवारी पहाटेच्या दरम्यान या पिंजऱ्यात अखेर बिबट्या जेरबंद झाला.
जेरबंद बिबट्या वन विभागाचे वनरक्षक साईमाला गीत्ते, रेस्क्यू सदस्य अशोक जाधव, विशाल ढोबळे, रामा वळसे, सोपान करंडे, सोमा जाधव यांनी बिबट्याला ताब्यात घेऊन अवसरी वन उद्यान येथे तपासणीसाठी पाठविले आहे अशी माहिती वनपाल सोनल भालेराव यांनी दिली.