Pune Police: गुंडांना राेखण्यात यश; पण वाहतूक कोंडी फाेडण्यात अपयशी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 01:46 PM2022-10-21T13:46:39+5:302022-10-21T13:51:39+5:30
शहरातील वाहतूक कोंडी हे माझं अपयश आहे, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली....
पुणे : शहरात गुन्हेगारी वाढली होती. जमिनी बळकावणे, कारागृहाबाहेर मिरवणुका काढणे, तलवारीने केक कापल्याचे व्हॉटस्ॲप स्टेटस ठेवणे असे प्रकार वाढले होते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी टोळ्यांसह गुंडांवर मोक्का लावण्यास सुरुवात केली. या कारवाईची गुंडांमध्ये इतकी दहशत बसली की, सध्या चुकीचा व्हॉटस्ॲप स्टेटस ठेवण्याचीही कुणाची हिंमत हाेत नाही, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अभिमानाने सांगितले. त्याचबराेबर शहरातील वाहतूक कोंडी हे माझं अपयश आहे, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.
पोलीस आरोग्य मित्र फाउंडेशनच्या वतीने ‘शतक मोक्काचे, कौतुक पोलिसांचे’ या कार्यक्रमांतर्गत अमिताभ गुप्ता यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी आयुक्तांना विविध विषयांवर बोलते केले. ‘वाहतूक कोंडीच्या वेळी रस्त्यांवर पोलीस का दिसत नाहीत?’ असा सवाल गाडगीळ यांनी विचारला असता पोलीस उपायुक्त किंवा पोलीस काम करत नसतील तर ती नेतृत्वाच्या नात्याने माझी जबाबदारी आहे.
शहरातील वाहतूक कोंडी हे माझे अपयश आहे. वाहतूक हा शहर नियोजनाचा भाग आहे. मी जबाबदारी झटकत नाही. मात्र अरुंद रस्ते, अतिक्रमण, पायाभूत सुविधांची कामे, खड्डे, पाऊस हीदेखील वाहतूक कोंडीमागील कारणे आहेत. यापुढील काळात अधिकाधिक कर्मचारी रस्त्यांवर असतील, असे आश्वासनही आयुक्तांनी दिले.
टोळ्यांची कुंडली तयार
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) हा एक कायदा आहे. यात पोलिसांना अधिकार देण्यात आले आहेत. मोक्का कारवाईमध्ये आरोपीला जामीन मिळत नाही. तुम्ही एक बदमाषी कराल तर मी दहा बदमाषा करीन असा एकप्रकारे इशारा देत, आम्ही टोळ्यांची कुंडली तयार केली, असे पाेलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
भोग्यांचा आवाज कमी हाेईल
हल्ली आवाज कुणालाच सहन होत नाही. दोन वर्षांनंतर सण साजरे करण्याची संधी मिळाल्याने गणेशोत्सव व इतर सणांमध्ये आवाजावर नियंत्रण ठेवू शकलो नाही. आम्हाला कुणावर केस दाखल करायच्या नव्हत्या. मात्र आता पोलिसांनी लाउडस्पीकर आणि पबवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यापुढील काळात मंदिरांसह मशिदींवरील भोंग्यांचा आवाज कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
स्वयंशिस्त महत्त्वाची
क्रिकेटमध्ये फलंदाज हेल्मेट घालत नव्हते. अपघात झाल्यानंतर वापर सुरू झाला; पण वाहनचालक कधी घालणार? सायकलस्वारसुद्धा घालतो. मग वाहनचालकांना काय प्रॉब्लेम आहे? चारचाकी चालविताना सीट बेल्ट बांधणे, रस्त्यात न थुंकणे, वाहतुकीचे नियम पाळणे यांकरिता स्वयंशिस्त महत्त्वाची असल्याकडे पाेलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी लक्ष वेधले.