राज्य राखीव पोलीस बल कर्मचाऱ्यांचे यश
By admin | Published: May 12, 2017 05:24 AM2017-05-12T05:24:07+5:302017-05-12T05:24:07+5:30
आॅगस्ट २०१६मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या खात्याअंतर्गत फौजदार परीक्षेचा निकाल नुकताच लागला
लोकमत न्यूज नेटवर्क
हडपसर : आॅगस्ट २०१६मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या खात्याअंतर्गत फौजदार परीक्षेचा निकाल नुकताच लागला. यात वानवडी येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १ च्या १८ पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावून खडतर परिश्रमांतून या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले आहे. या सर्व यशस्वी पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस उपनिरीक्षकपदावर निवड झाली आहे.
नक्षल बंदोबस्त, आंतर सुरक्षा बंदोबस्त तसेच दैनंदिन कर्तव्य संभाळून या परीक्षेत गट क्र. १च्या १८ कर्मचाऱ्यांनी यश संपादन केले आहे. २१ आॅगस्ट २०१६ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून खात्याअंतर्गत ही परीक्षा घेण्यात आली होती. ५ मे रोजी याचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यात मंगेश देशमुख, अरुण साठे, सागर वाघमारे, संतोष मोरे, संदीप खलाटे, सागर भोसले, श्रीकांत साकोरे, शैलेश जगताप, सुधीर साठे, भारत वारे, किरण शेवाळे, युवराज पाटील, प्रमोद कोळेकर, मुकेश मोहारे, राजू गवळी, योगेश चाहेर, सतोष काळभोर, रविराज कांबळे यांनी यश संपादन केले.
स्पर्धेच्या युगात अपयशाला न डगमगता या कर्मचाऱ्यांनी यश संपाद केले. यापुढेही ते यशस्वी होतील. त्यांच्याकडून अशीच निरंतर देशसेवा घडो, अशा शब्दांत माजी महापौर प्रशांत जगताप यांनी यशस्वी पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.