Success Story : जिद्दीला सलाम ..! वेल्डिंगचे काम करत भारतीय सैन्य दलाच्या परीक्षेत मिळवले यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 17:46 IST2025-03-21T17:46:10+5:302025-03-21T17:46:44+5:30

वडिलांचे निधन झाल्यानंतर बंधू विजय यांच्या साथीने शालेय शिक्षण पूर्ण करता करता वेल्डिंग व्यवसाय चालू केला.

Success Story Salute to stubbornness Successfully passed the Indian Army exam while doing welding work | Success Story : जिद्दीला सलाम ..! वेल्डिंगचे काम करत भारतीय सैन्य दलाच्या परीक्षेत मिळवले यश

Success Story : जिद्दीला सलाम ..! वेल्डिंगचे काम करत भारतीय सैन्य दलाच्या परीक्षेत मिळवले यश

राहू : वडिलांचा पारंपरिक फॅब्रिकेशन,गवंडी काम व्यवसाय परंतु शिक्षण घेत असताना वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबाचा आधारवड गेला. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत गावात वेल्डिंगचे काम करून उदरनिर्वाह करत स्पर्धा परीक्षेतील अभ्यासात सातत्य आणि जिद्द, चिकाटीच्या जोरावर राहू (ता. दौंड) येथील सुनील नामदेव कांबळे या युवकाने यश खेचून आणले आहे. त्याची भारतीय सैन्य दलात निवड झाली असून आपल्या मोलमजुरी करणाऱ्या आईचे स्वप्न साकार केले आहे.

जीवनात परिस्थिती कशीही असली तरी प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस असाध्य ते साध्य करू शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे राहू येथील सुनील कांबळे हा युवक होय. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची यातच डोक्यावर वडिलांचे छत्र नाही. कुटुंबातील आई व बहिणीची जबाबदाररी अशा प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीवर संघर्षपूर्ण मात करून सुनीलने यशाचे शिखर सर केले. प्राथमिक शिक्षण राहू येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत, त्याचबरोबर माध्यमिक आणि उच्च शिक्षण कैलास विद्या मंदिर माध्यमिक विद्यालयात झाले आहे. इयत्ता दहावीच्या कालावधीत वडिलांचे निधन झाल्यानंतर बंधू विजय यांच्या साथीने शालेय शिक्षण पूर्ण करता करता वेल्डिंग व्यवसाय चालू केला. आईने दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीने कामाला जाऊन सुनीलच्या शिक्षणासाठी हातभार लावला होता. सुनीलला अगदी लहानपणापासून भारतीय सैन्य दलाचे आकर्षण होते.

बारावीनंतर पुणे येथील गरवारे महाविद्यालयात एनसीसी जॉइन केले. यानंतर महाराष्ट्र रायफल शूटिंगमध्ये गोल्ड मेडल पटकावले. या यशानंतर त्याने वेल्डिंगचे काम करत पदवी अभ्यासक्रम, सैन्य दल भरतीचा अभ्यास चालू ठेवला होता. शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी कैलास विद्यामंदिर विद्यालयाच्या क्रीडांगणावर दररोज सकाळी धावणे तसेच व्यायामाचा जोरदारपणे सराव केला. घरातील परिस्थितीची जाण आणि स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासातील सातत्य, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर केला त्याने भारतीय सैन्यदल भरती परीक्षेत यश मिळवले आहे. निकालाची बातमी ऐकताच आई शारदा कांबळे यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. प्रतिक्रिया देत असताना त्यांना गहिवरून आले. संघर्षातून आदर्श यशोगाथा तयार केलेल्या सुनील कांबळे याची भारतीय सैन्य दलात निवड झाल्यानंतर सर्व स्तरातून कौतुक होत असून यावेळी आमदार राहुल कुल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Success Story Salute to stubbornness Successfully passed the Indian Army exam while doing welding work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.