संघर्षाला यश, मात्र असमाधानीच
By admin | Published: August 7, 2016 04:26 AM2016-08-07T04:26:34+5:302016-08-07T04:26:34+5:30
शहराला रोज पाणी देण्याचा निर्णय झाल्यानंतरही महापौर प्रशांत जगताप यांनी त्याबद्दल असमाधानी असल्याचे म्हटले आहे. वाढत्या दबावामुळे पालकमंत्री गिरीश बापट यांना
पुणे : शहराला रोज पाणी देण्याचा निर्णय झाल्यानंतरही महापौर प्रशांत जगताप यांनी त्याबद्दल असमाधानी असल्याचे म्हटले आहे. वाढत्या दबावामुळे पालकमंत्री गिरीश बापट यांना मनाविरुद्ध निर्णय घ्यावा लागला व त्यातून त्यांनी पुण्याच्या रोजच्या पाण्याच्या कोट्यात कपात केलीच, असे महापौरांचे म्हणणे आहे. हक्काचे पाणी मिळावे यासाठी आता पुणेकरांनीच आवाज उठवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. पाण्यासंबंधीची बैठक झाल्यानंतर लगेचच महापौरांनी आपली नाराजी व्यक्त केली. मागील ३ महिने महापौर या नात्याने पुण्याच्या पाण्यासाठी पालकमंत्री व पाटबंधारे विभाग यांच्याबरोबर संघर्ष केला. त्यात भारतीय जनता पक्ष वगळता सर्व जण सहभागी झाले. वाढत्या दबावामुळे अखेर पालकमंत्री बापट यांनी घाईघाईत कालवा समितीची बैठक आयोजित केली. त्यात त्यांनी कपात रद्द करण्याचा निर्णय घेतला; मात्र पुण्यासाठीच्या पाण्याच्या कोट्यात कपात केली. मनाविरुद्ध निर्णय घ्यावा लागला असल्यानेच त्यांनी पुणेकरांवर हा अन्याय केला, असा आरोप महापौर जगताप यांनी केला. जोरदार पाऊस झाल्यामुळे पाणीकपात करण्याची कोणतीही आवश्यकता नाही, अशीच भूमिका काही स्वयंसेवी संस्था, कार्यकर्त्यांनीही व्यक्त केली होती. शहराची पाण्याची रोजची गरज १२.५० एमएलडी धरणांमध्ये २६.५० टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या ४ दिवसांत पुणेकरांना ६ महिने पुरेल इतके पाणी नदीत सोडले गेले. पावसाळ्याचे आणखी २ महिने शिल्लक आहेत. पुणे शहराची पाण्याची रोजची गरज १२.५० एमएलडी आहे. हे माहिती असूनही पालकमंत्र्यांनी पुण्याला रोज ११. ५० एमएलडी पाणी देण्याचा निर्णय घेतला. त्याला विरोध केल्यानंतर १२ एमएलडी पाणी देण्याचे जाहीर केले. त्यांची ही भूमिका पुणेकरांच्या विरोधात असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. दररोज १२.५० एमएलडी पाणी मिळणे हा पुणेकरांचा हक्क आहे व तोच डावलला जात आहे. आपण तर त्याविरोधात कायम आवाज उठविणारच आहोत, पण पुणेकरांनीही आता या निर्णयाला विरोध करावा, असे आवाहन महापौर जगताप यांनी केले.