दिव्यांगांचे जलतरणात यश
By admin | Published: January 13, 2017 02:56 AM2017-01-13T02:56:11+5:302017-01-13T02:56:11+5:30
कोेकणात मालवणजवळ चिवला बीच येथे समुद्रात घेण्यात आलेल्या सातव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत
पिंपरी : कोेकणात मालवणजवळ चिवला बीच येथे समुद्रात घेण्यात आलेल्या सातव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत सहभागी झालेल्या पिंपरी चिंचवडमधील सहा स्पर्धकांपैकी तीन दिव्यांग मुलांनी चमकदार कामगिरी केली. दोन किलोमीटर पोहण्याच्या स्पर्धेत अभिजीत देवकर याच्यासह वैष्णवी जगताप, कॅमिला पटनायक या दिव्यांग मुलांनी रौप्यपदक, कांस्यपदक मिळवले.
महाराष्ट्र राज्य हौसी जलतरण संघटना, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एक हजार स्पर्धक सहभागी झाले होते. पिंपरी चिंचवड शहरातुन या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
त्यात तीनजणांनी यशस्वी कामगिरी केली. अभिजीत देवकर (मतीमंद) हा व्दितीय क्रमांक मिळवुन रौप्य पदकाचा मानकरी ठरला. रन स्वीम रन प्रकारात त्याला सुवर्णपदक मिळाले. वैष्णवी विनोद जगताप (अस्थिव्यंग) हिने तृतीय क्रमांक मिळवून कांस्यपदक पटकाविले. कॅमिला पटनायक (डाऊन सिंड्रोम) हिने स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकाविला. रविकांत बालवडकर, कार्तिक काळे हे बक्षीसपात्र ठरले नसले, तरी त्यांनी ही स्पर्धा पूर्ण केली. सागरी जलतरण स्पर्धेत दिव्यांग मुलांच्या चमकदार कामगिरीबद्दल शहरात कौतुक होत आहे. त्यांच्या शाळांतर्फे आणि इतरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. (प्रतिनिधी)