जेजुरीकरांच्या आंदोलनाला यश, भंडारा उधळून आनंदोत्सव, धर्मादाय आयुक्तांकडून हिरवा कंदील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 06:21 PM2023-06-07T18:21:52+5:302023-06-07T18:22:30+5:30
सद्याच्या विश्वस्त मंडळाची सदस्य संख्या ७ वरून ११ करण्याबाबत आयुक्त कार्यालयाकडून सूचना
जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीच्या मार्तंड देव संस्था न विश्वस्त निवडीविरोधात गेल्या १३ दिवसांपासून जेजुरीकरांनी एकी दाखवत आंदोलन सुरू ठेवले होते. आज या आंदोलनाला यश आले असून ग्रामस्थांच्या मागणीला धर्मादाय आयुक्त कार्यालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. सद्याच्या विश्वस्त मंडळाची सदस्य संख्या ७ वरून ११ करण्याबाबत आयुक्त कार्यालयाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
मार्तंड देव संस्थान च्या पंचवार्षिक विश्वस्त निवडी पुण्याच्या धर्मादाय आयुक्त कार्यायाकडून गेल्या महिन्यात करण्यात आल्या होत्या. या निवडीमध्ये जेजुरी पंच क्रोशीतील केवळ दोन जणांना संधी देण्यात आली होती. इतर पाच विश्वस्त बाहेर गावचे निवडण्यात आले होते. विश्वस्त निवडीत राजकीय हस्तक्षेप होऊन विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली होती. याशिवाय ज्यांना इथल्या रूढी, परंपरा माहीत नाही अशांच्याच निवडी झाल्याने जेजुरीकर ग्रामस्थांनी गेल्या १३ दिवस उपोषण आंदोलन उभारले होते.
दरम्यान, आज पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयात ग्रामस्थांच्या फेर याचिकेची सुनावणी पार पडली. यावेळी आंदोलकांची मागणी मान्य करण्यात आली. नव्याने नियुक्त झालेल्या विश्वस्तांना ग्रामस्थांच्या मागणीनुसार घटना दुरुस्ती करून विश्वस्त कमिटी ७ ऐवजी ११ करण्याचा ठराव करून आयुक्त कार्यालयाकडे पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया पुढील दोन महिन्यात पूर्ण करून इतर चार जणांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश आल्याने ग्रामस्थानी उपोषणस्थळी देवसंस्थांन कमिटी कार्यलयासमोर भंडार उधळून जल्लोष साजरा केला.