दुष्काळावर मात करून वांग्याची यशस्वी लागवड
By admin | Published: December 22, 2015 01:30 AM2015-12-22T01:30:53+5:302015-12-22T01:30:53+5:30
दुष्काळाशी मुकाबला करून ठिबक सिंचन पद्धतीने सेंद्रिय खताचा वापर करीत तालुक्यातील माळवाडी नं. २ येथील दीपक त्रिंबक गार्डे या युवा शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रात वांग्याची यशस्वी लागवड केली आहे.
इंदापूर : दुष्काळाशी मुकाबला करून ठिबक सिंचन पद्धतीने सेंद्रिय खताचा वापर करीत तालुक्यातील माळवाडी नं. २ येथील दीपक त्रिंबक गार्डे या युवा शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रात वांग्याची यशस्वी लागवड केली आहे.
खते, बियाणे, औषधे आदींचा २३ हजार रुपये खर्च वजा जाता, महिनाभरात ३५ हजार रुपयांचा नफा झाला आहे. येत्या ३ महिन्यांत १ लाख रुपये निव्वळ नफा मिळेल, असा गार्डे यांना विश्वास आहे.
सप्टेंबर महिन्यात त्यांनी वांग्याची लागवड केली. प्रारंभी शेणखताचा मोठ्या प्रमाणात वापर केला. गेल्या महिन्यात पहिला तोडा झाला. दहा कॅरेट वांग्याचे उत्पादन मिळाले. प्रतिकॅरेट २५० रुपये दर मिळाला. या वांग्याला इंदापूर व अकलूजच्या बाजारपेठेत चांगली मागणी आहे. ‘लोकमत’शी बोलताना दीपक गार्डे यांनी सांगितले, की वांगे आकाराने मोठे आहे. यामुळे मागणी चांगली आहे. लग्नसराईचा फायदाही मिळाला. मध्यंतरी अळीचा प्रादुर्भाव झाला होता; मात्र फेम या औषधाच्या एका फवारणीने अळीवर नियंत्रण मिळाले. सध्या दररोज तोडणी चालू आहे. बाजारात नेलेले वांगे माघारी आणण्याची वेळ आलेली नाही. अजून ३ महिने वांगी निघतील. महिन्याला ३५ हजार रुपये उत्पन्न धरले, तरी १ लाख रुपयांपर्यंत नफा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.