दुर्मिळ यकृत आजाराशी चिमुकलीची यशस्वी झुंज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 07:34 PM2020-01-23T19:34:53+5:302020-01-23T19:41:07+5:30
गुंतागुंतीच्या परिस्थितीवर यशस्वीपणे मात करत डॉक्टरांनी तिची जगण्यासाठीची झुंज यशस्वी केली.
पुणे : जन्माला आल्यानंतर वर्षभरातच तिची यकृताच्या दुर्मिळ आजाराशी झुंज सुरू झाली. सुरूवातीचे काही महिने नेमका आजार कोणता हे कळण्यात गेली होती. दिवसेंदिवस प्रकृती खालावत चालल्याने आई-वडिलांची चिंता वाढली. एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू झाल्यानंतर यकृतासह मुत्रपिंड निकामी होण्याचा धोका होता. त्यातच यकृताचा कर्करोग होण्याची लक्षणे व यकृत प्रत्योरापणानंतर नवीन यकृत स्वीकारण्यास झालेला अडथळा... अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीवर यशस्वीपणे मात करत डॉक्टरांनी तिची जगण्यासाठीची झुंज यशस्वी केली.
स्वरा असे तिचे नाव. वय फक्त अडीच वर्षे. कराड येथील सुहास व रेश्मा शिंदे यांची ती मुलगी आहे. पुण्यातील सह्याद्री रुग्णालयामध्ये नुकतीच तिच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. आता ती इतर लहान मुलांप्रमाणेच आपले आयुष्य जगत आहे. स्वरा ही एक वर्षाची असताना तिचे यकृत निकामी झाल्याची लक्षणे दिसू लागली. तिच्यावर उपचारासाठी वडील राज्यासह राज्याबाहेरही अनेक रुग्णालयांमध्ये गेले. पण आर्थिक परिस्थिती अडथळा ठरत असल्याने काही रुग्णालयांनी नकार दिला. तर काही ठिकाणी नेमका आजार निष्पन्न होत नव्हता. दीड वर्षाची असताना तिला ‘टायरोसिनेमिया’ हा दुर्मिळ चयापचयाचा आजार असल्याचे निष्पन्न झाले. पण खचून न जाता सुहास यांनी हार मानली नाही.
सह्याद्री रुग्णालयातील अवयव प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. बिपीन विभुते यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, उपचार सुरू केले तेव्हा तिचे वय अडीच वर्षे एवढे होते. तर वजन केवळ ५.९ किलो. रुग्णालयात उपचार सुरू केले तेव्हा तिच्या हातपाय व छातीपमध्ये विकृती दिसून येत होती. यकृतामध्ये कर्करोगाची लक्षणे दिसून आली. त्यामुळे प्रत्यारोपण पुढे ढकलावे लागले. यातून ती बरी झाल्यानंतर प्रत्योरापण करण्यात आले. यासाठी तिची आईच दाता म्हणून पुढे आली. ही शस्त्रक्रिया अत्यंत जोखमीची होती. पण डॉक्टरांच्या प्रयत्नांप्रमाणेच मुलीच्या शरीराने दिलेला प्रतिसादही महत्वाचा ठरला. रुग्णालयातील डॉ. स्नेहवर्धन पांडे, डॉ. सागर लाड, डॉ. शीतल महाजनी, डॉ. दिनेश बाबू यांच्यासह इतर डॉक्टरांचे सहकार्य महत्वाचे होते.