राज्यातील कारागृहात कोरोनाशी यशस्वी लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:28 AM2020-12-12T04:28:23+5:302020-12-12T04:28:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : देशभरात सर्वत्र कोरोनाचा वाढता संसर्ग होत असताना क्षमतेपेक्षा दुप्पटीहून अधिक कैद्यांची संख्या असलेल्या राज्यातील ...

Successful fight with Corona in state prisons | राज्यातील कारागृहात कोरोनाशी यशस्वी लढा

राज्यातील कारागृहात कोरोनाशी यशस्वी लढा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : देशभरात सर्वत्र कोरोनाचा वाढता संसर्ग होत असताना क्षमतेपेक्षा दुप्पटीहून अधिक कैद्यांची संख्या असलेल्या राज्यातील कारागृहे कोरोनाशी मुकाबला करण्यात यशस्वी ठरली आहेत. राज्यातील सर्व कारागृहात मिळून मार्चपासून ९ डिसेंबरपर्यंत २ हजार ४६४ कैदी कोरोना बाधीत झाले होते. त्यापैकी २ हजार ४२४ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. या कालावधीत ६ कैद्यांचा मृत्यु झाला.

मार्चमध्ये कोरोना प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर त्याचा धोका ओळखून कारागृहात नवीन कैदी घेण्यास बंद करण्यात आले. जिल्ह्यांमध्ये तात्पुरती कारागृहे उभारण्यात आली. तेथे नवीन कैद्यांना ठेवण्यात येत होते. त्यांची चाचणी केल्यानंतर काही दिवसांनी त्यांची प्रकृती लक्षात घेऊन त्यांना मुख्य कारागृहात हलविण्यात येत होते. या काळात राज्यातील कारागृहात तब्बल ३१ हजार ९६९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या़.

कोरोनाची लक्षणे दिसू लागलेल्या कैद्यांना तातडीने वेगळे करुन त्यांच्यासाठी स्वतंत्र बॅरेक तयार केल्या. राज्यातील २ हजार ४२४ कोरोना बाधितांपैकी पुण्यातील येरवडा कारागृहात सर्वाधिक ३२६ कैद्यांना लागण झाली होती. त्यापैकी ३२३ जण बरे झाले. कारागृहातील सुविधेमुळे अनेक कैदी ससून रुग्णालयात दाखल करण्यापेक्षा कारागृहातच ठेवा असे सांगत होते. नागपूर २२१, मुंबई १८४, सागली १८८, अमरावती १४०, कोल्हापूर १२२ कैदी बाधित झाले होते. बाधितांना विशेष डायट जेवण, मानसिक व शारीरीक क्षमतेसाठी मार्गदर्शन करण्यात येत होते.

कैद्यांबरोबरच ५४० कारागृह अधिकारी आणि कर्मचारी कोरोना बाधित झाले होते. त्यापैकी आतापर्यंत ५२९ जण पूर्णपणे बरे झाले असून या कालावधीत ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

१० हजार ७७१ कैद्यांना पॅरोल, जामीन

कोरोनाचा प्रादुर्भाव कारागृहात पसरु नये म्हणून उच्च स्तरीय समिती नेमून त्याद्वारे कच्चे कैदी, शिक्षाधीन कैदी यांच्या पॅरोल अथवा जामीनासाठी तरतुद करुन घेतली. त्यातून आतापर्यंत १० हजार ७७१ कैद्यांना कारागृहातून सोडले. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक कैदी असलेल्या कारागृहाचे व्यवस्थापन करणे सोपे झाल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व कारागृह निरीक्षक सुनील रामानंद यांनी सांगितले.

Web Title: Successful fight with Corona in state prisons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.