मुळशीत हळद उत्पादनाचा पॅटर्न यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:15 AM2021-08-22T04:15:05+5:302021-08-22T04:15:05+5:30
तुकाराम मरे यांनी नोकरीच्या नादी न लागता स्वतःची शेती करायचे ठरवूनच मुळशीत भात पीक, इंद्रायणी जातीच्या वाणाचे चारसूत्री पद्धतीने ...
तुकाराम मरे यांनी नोकरीच्या नादी न लागता स्वतःची शेती करायचे ठरवूनच मुळशीत भात पीक, इंद्रायणी जातीच्या वाणाचे चारसूत्री पद्धतीने उत्तम पीक काढले. त्यापाठोपाठ भात कापणीनंतर पारंपरिक हरभरा, काळा गावरान वाटाणा, नाचणीसारखी पिके घेतली. खतासाठी व आर्थिक उत्पादनासाठी गायी पाळून दूध पाळले त्यातून संसाराच्या गरजा भागायला लागल्या. मात्र त्यातून काही वेगळा प्रयोग केल्याचे समाधान मिळत नव्हते. काही तरी वेगळा प्रयोग शेतीत करण्याचा त्यांचा मानस होताच. त्याचवेळी ते सातारा येथील मित्राच्या घरी गेल्यावर तेथील हळद पीक पाहिले व ते पीक मुळशीत घ्यावे या प्रेरणेने सुरुवातीला १० किलो हळद लागवड करून उत्पादन सुरू केले. त्यामध्ये यश आल्यावर पुढे पाचपैकी अडीच एकरावर हळद लागवड केली. त्यास शेणखत देऊन सेंद्रिय हळद पीक घेऊन त्या उत्पादीत हळदिस प्रक्रिया करून सेंद्रिय हळद पावडर तयार केली. त्याची विक्री घरीच सुरू केली. लवासा या पर्यटन क्षेत्रावर येणाऱ्या शहरी नागरिकांना बाजारभावापेक्षा कमी भावाने हळद विक्री केली. हळदीबरोबर घरचे तांदूळ, नाचणी, वाटाणा, हरभरा याची पॅकिंग करून विक्री केली. त्यातून स्वतः बाजारपेठ उपलब्ध करून घेतली.
--------------------
महिला सबलीकरणाचे काम
या कामासाठी परिसरातील महिला भगिनी एकत्र करून शेतकरी महिला कंपनी सुरू केली. परिसरातील शेतमाल त्या कंपनीमार्फत गावातच विकून महिला सबलीकरणाचे काम तुकाराम मरे यांनी केले. त्यास पंचायत समिती कृषी खाते व महाराष्ट्र शासन कृषी खाते मुळशी यांचे मार्गदर्शन मिळाले. एवढ्यावर न थांबता त्यांनी जिल्ह्याबाहेर जळगाव, नाशिक, कोकण येथे जाऊन केळी व आंबा व फळबागाचा अभ्यास केला.
--