जिल्ह्यातील अष्टविनायक मंदिरांत गणेशाेत्सवाची जय्यत तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 01:18 PM2022-08-27T13:18:53+5:302022-08-27T13:19:54+5:30
विश्वस्थांनी अतिरिक्त रुग्णवाहिका मागितल्यास त्या पुरवल्या जाणार...
पुणे :गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाचही अष्टविनायक मंदिरांच्या ठिकाणी भाविकांच्या सोयीसुविधांबाबतची तयारी पूर्ण झाली आहे. उत्सव अवघ्या पाच दिवसांवर आला असून, येथे रविवार (दि. २८) पासूनच भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी थेऊर, मोरगाव, ओझर, लेण्याद्री व रांजणगाव येथील मंदिरांना भेटी दिल्या. यावेळी विविध विभागांचे स्थानिक अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि मंदिराच्या विश्वस्तांशी बाेलून तेथील तयारीचा आढावा घेतला. या सर्व ठिकाणी भाविकांच्या स्वागतासाठी सर्व गावांनी जय्यत तयारी केल्याचे सांगण्यात आले.
आयुष प्रसाद यांनी यावेळी पार्किंग आणि शौचालये, पथदिवे आदी सुविधा देणे, माहिती फलक लावणे, अंतर्गत रस्ते नियमितपणे स्वच्छ करणे, परिसर कचरामुक्त ठेवण्याच्या सूचना केल्या. गरजेनुसार लगतच्या गावांमधून अतिरिक्त मनुष्यबळ मागवावे, असेही त्यांनी सांगितले. ज्या भागात भाविकांनी रांगा लावणे अपेक्षित आहे तेथे पिण्याच्या स्वच्छ पाण्याची उपलब्धता असावी, सर्व ठिकाणी शौचालयांची उपलब्धता हवी, गरज भासल्यास तात्पुरती शौचालये उभारावीत, असेही त्यांनी सांगितले.
ही खबरदारी घेतली जाणार
- मंदिरांच्या विश्वस्थांनी अतिरिक्त रुग्णवाहिका मागितल्यास त्या पुरवल्या जाणार आहेत. तसेच या काळात आवश्यक औषधांसह दोन-तीन वैद्यकीय शिबिरे उभारण्यात येतील. त्यात कोरोना चाचणी सुविधाही असेल.
- लगतची रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. जलस्रोतांचे नमुने आणि विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांची आरोग्य आणि अन्न व औषध प्रशासन विभागांकडून नियमितपणे चाचणी घेतली जाईल.