मुंबईच्या महिलेची पुरंदर तालुक्यात यशस्वी शस्त्रक्रिया; पोटातून काढली सात किलोची गाठ, रुग्णालयातच लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 12:21 PM2021-06-17T12:21:55+5:302021-06-17T12:34:28+5:30
नीरेत पहिल्यांदाच क्लिष्ट शस्त्रक्रिया: मुंबईतील रुग्णालयांनी शस्त्रक्रियेस दिला होता नकार
नीरा: मुंबईतील कुटुंब सलग दोन वर्षे लॉकडाऊनमुळे वर्कफ्रॉम होमद्वारे घरीबसूनच काम केल्याने पोटाची व्याधी झाली. गर्भाशया शेजारी मोठी गाठ वाढल्याने त्रास वाढला, मुंबईतील डॉकट्टरांनी शस्त्रक्रिया क्लिष्ट असल्याने नकार दिला. त्यानंतर दिराने महिलेला पुरंदर तालुक्यातील नीरा येथे खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची विनंती केली. शस्त्रक्रिया साडेचार तास चालली, सुमारे सात किलोची गाठ काढल्यावर दुसऱ्या दिवशी महिला चालू लागली. तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज वेळी महिलेच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस रुग्णालयातच केक कापून साजरा करण्यात आला.
मागील वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढत गेल्याने शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आली त्यामुळे शिक्षकांना वर्कफ्रॉम होम अंतर्गत घरीच बसून शैक्षणिक धडे देणे सुरु केले. मुंबईतील शिक्षिका वैशाली शामराव गायकवाड (वय ४५) यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास दोन वर्षापासून उदभवलेल्या गाठीने गायकवाड या त्रस्त होत्या. सोनोग्राफी मध्ये १७ ते १८ सेंटीमीटरची गर्भाशयाला चिकटलेली गाठ असल्याचे निदान झाले. गाठ मोठी व शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असल्याने मुंबईतील बऱ्याच ठिकाणच्या रुग्णालयांनी पेशंटला नकारास सामोरे जावे लागले होते.
नीरा येथील पळसे हॉस्पिटल मधिल स्त्रीरोग तज्ञ डॉ. ममता पळसे यांनी रुग्णाची तपासणी केल्यानंतर ही शस्त्रक्रिया आपल्या रुग्णालयामध्ये होऊ शकेल असे सांगत, पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा दिला. मागील आठवड्यात डॉ. ममता पळसे यांनी हॉस्पिटल स्टाफच्या सहकार्याने ही क्लिष्ट शस्त्रक्रिया पार पाडली.
मागील आठवड्यात कोरोनासह इतर सर्व तपासण्या केल्यानंतर, सुमारे दिड ते दोन तास शस्त्रक्रिया चालेल या अंदाजाने शस्त्रक्रिया सुरु केली पण सुमारे साडे चार तास ही शस्त्रक्रिया चालली होती. अशा प्रकारे ही नीरा पंचक्रोशीतील पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचे डॉ. पळसे यांनी सांगितले. महिला रुग्ण दुसऱ्या दिवशी स्वतः उठून चाल फिरु शकली, तिसऱ्या दिवशी पेशंट ठणठणीत बरा होऊन डिस्चार्ज घेण्यासाठी सज्ज झाली. संयोगाने त्याच दिवशी पेशंटच्या लग्नाची २५ वर्षे पूर्ण झाली होती. त्यामुळे रुग्णालयातर्फे अभिष्टचिंतन करुन केक कापत लग्नाच वाढदिवस साजरा करण्यात आला.