दोन्ही मूत्रपिंडांमध्ये कर्करोग असलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:12 AM2021-06-16T04:12:55+5:302021-06-16T04:12:55+5:30

पुणे : वरिष्ठ मूत्रपिंडतज्ज्ञ प्रा. डॉ. सुरेश पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या टीमने एका ५६ वर्षीय महिलेवर मूत्रपिंड कर्करोगासंबंधी यशस्वी ...

Successful surgery on a patient with cancer in both kidneys | दोन्ही मूत्रपिंडांमध्ये कर्करोग असलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया

दोन्ही मूत्रपिंडांमध्ये कर्करोग असलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया

Next

पुणे : वरिष्ठ मूत्रपिंडतज्ज्ञ प्रा. डॉ. सुरेश पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या टीमने एका ५६ वर्षीय महिलेवर मूत्रपिंड कर्करोगासंबंधी यशस्वी शस्त्रक्रिया केली. दुर्मिळ प्रक्रियेमध्ये एकाच वेळी दोन्ही मूत्रपिंडांवर कर्करोग शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या टीममध्ये मूत्रविकार तज्ज्ञ डॉ. सूपर्ण खळदकर आणि डॉ. गुरुराज पडसलगी यांचा समावेश होता. या स्वरूपाची पुण्यातील पहिलीच शस्त्रक्रिया आहे. यामध्ये वेलोर, तामिळनाडू येथे ख्रिश्चन मेडिकल कॉलेज व श्रीनगरमधील गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज यांचा समावेश आहे.

नाशिकमधील महिला ८ वर्षांपासून दोन्ही मूत्रपिंडांच्या कर्करोगाने ग्रस्त होती. त्यांनी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि डॉक्टरांनी रुग्णाला कायमचे नियमित डायलिसिस करावे लागेल, असे सांगितले होते. पुण्यातील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया केल्यानंतर, या महिलेच्या मूत्रपिंडाच्या काही भागाचे कार्य पुन्हा जवळजवळ सामान्य स्थितीत आले असून यामुळे कायमच्या डायलिसिसची आवश्यकता आता भासणार नाही.

वरिष्ठ मूत्रपिंडतज्ज्ञ डॉ. सुरेश पाटणकर म्हणाले, ‘वैद्यकीय अहवालानुसार महिलेला तिसऱ्या टप्प्यातील ट्युमर झाला होता. त्यामध्ये संपूर्ण डावे मूत्रपिंड आणि उजवीकडील मूत्रपिंडाचा अर्ध्याहून अधिक भाग यांचा समावेश होता. आम्ही शस्त्रक्रिया केली तेव्हा डाव्या मूत्रपिंडातून काढलेला ट्युमर २.७ किलो वजनाचा होता, तर उजव्या मूत्रपिंडातील ट्युमर सुमारे २५० ग्रॅमचा होता. मात्र, हा प्राथमिक किडनी ट्युमर अनुवांशिक किंवा जन्मजात नव्हता. संपूर्ण डावे मूत्रपिंड कर्करोगाने बाधित झाले होते आणि त्यामुळे रॅडिकल नेफ्रोक्टॉमी ही प्रक्रिया करण्याची आवश्यकता होती. उजव्या बाजूतील मूत्रपिंडाचा ६० टक्क्यांपेक्षा जास्त भाग हा कर्करोगाने ग्रस्त होता. जोखीम असूनही उजव्या मूत्रपिंडाचा काही भाग वाचवला जाऊ शकतो, ज्यामुळे रुग्णाला डायलिसिस टाळता येणे शक्य होईल, असा आम्ही विचार केला. याशिवाय अंतराने होणाऱ्या दोन प्रक्रिया केल्या तर कर्करोग अजून वाढला असता, कारण रुग्णाच्या उपचारामध्ये अनेक वर्षे दिरंगाई झाली होती.’

यशस्वी शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला मानसिक आधार

डॉ. पाटणकर आणि त्यांच्या टीमने केलेल्या रॅडिकल नेफ्रोक्टॉमी व सबटोटल पार्शिअल नेफ्रोक्टॉमी या शस्त्रक्रियांनंतर उजव्या बाजूतील राहिलेल्या मूत्रपिंडाचे कार्य सुरळीत ठेवण्यात यश आले. जागतिक स्तरावरील कर्करोग निदान व मृत्यूच्या प्रमाणामध्ये रेनल सेल कार्सिनोमा (आरसीसी) चे प्रमाण २ टक्के आहे. म्हणजेच प्रत्येक १ लाख व्यक्तींपैकी १४.९ असे याचे प्रमाण आहे. हा सर्वांत भयंकर मूत्रपिंडाच्या कर्करोगांपैकी एक आहे. यशस्वी शस्त्रक्रियेमुळे कर्करोगाच्या रुग्णांना एक मानसिक आधार मिळून मोठ्या शस्त्रक्रियांना सामोरे जाण्याचे धैर्य मिळेल, असे मत डॉ. सुरेश पाटणकर यांनी व्यक्त केले.

Web Title: Successful surgery on a patient with cancer in both kidneys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.