जय हो! भारताची मान पुन्हा अभिमानाने उंचावली; ओरिसात अग्नि प्राईम क्षेपणास्राची चाचणी यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 15:40 IST2021-06-28T15:22:22+5:302021-06-28T15:40:00+5:30
क्षेपणास्त्राचा लवकरच भारतीय सैन्य दलात याचा समावेश केला जाणार, १००० ते २००० किमीपर्यंत मारक क्षमता

जय हो! भारताची मान पुन्हा अभिमानाने उंचावली; ओरिसात अग्नि प्राईम क्षेपणास्राची चाचणी यशस्वी
पुणे: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) सोमवारी अग्नी प्रकारातील अत्याधुनिक अग्नी प्राईम या मध्यम पल्ल्याच्या अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता १००० ते २००० किमी पर्यंतची असून पाकिस्तान आणि चीनची अनेक महत्वाची शहरे या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आली आहे. यामुळे भारताने या दोन्ही देशांवर एकप्रकारे सामरिक आघाडी घेतली आहे. ओडिशा राज्यातील बलासोर येथील डॉ एपीजे अब्दुल कलाम आयलँड वरून सकाळी १०.५५ मिनिटांनी ही चाचणी करण्यात आली. अग्नी प्राईम हे कॅनिस्टर बेस क्षेपणास्त्र असून ते शत्रूच्या रडार यंत्रणा तसेच उपग्रहांना चकऊन ट्रक, रेल्वे या सारख्या प्रक्षेपक यंत्रणेवरून डागता येऊ शकते.
इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अंतर्गत १९८९ मध्ये शास्त्रज्ञ तसेच माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी अग्नी प्रकारातील अण्वस्त्र वाहून नेऊ शकणाऱ्या स्वदेशी आंतरखंडीय क्षेपणास्त्राचा कार्यक्रमाला सुरवात केली होती. त्यानुसार अग्नी प्रकारातील अग्नी १ ते ५ ही क्षेपणास्त्र विकसित करण्यात आली आहे. सध्या 'अग्नी 6' हे 10 हजार किमी पर्यंतची मारक क्षमता असलेले क्षेपणास्त्र विकास प्रक्रियेत आहे.
अग्नी १ हे क्षेपणास्त्र विकसित करून बराच अवधी लोटला होता. यामुळे या क्षेपणास्त्राच्या आधुनिकीकरणाची गरज डी.आर.डी.ओ. तसेच भारतीय सैन्य दलाने व्यक्त केली होती. त्यानुसार अग्नि प्राईम या नव्या क्षेपणास्त्राच्या विकासाचा कार्यक्रम डीआरडीओने हाती घेतला होता. अग्नि प्राईम हे क्षेपणास्त्र अग्नि १ च्या तुलनेत वजनाने हलके आहे. तसेच हे टु स्टेज सॉलिड फुएल क्षेपणास्त्र असण्याने अग्नी १ च्या तुकनेत प्राईम क्षेपणास्त्राचा मारा करण्याचा पल्ला ही मोठा आहे.
क्षेपणास्त्राच्या सर्व प्रकारच्या चाचण्या पूर्ण
चाचणीसाठी डीआरडीओ नो फ्लाय झोन घोषित केला होता. ठरलेल्या वेळेला ही चाचणी घेण्यात आली. क्षेपणास्त्राने नेमून दिलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला असून सर्व प्रकारच्या चाचण्या या पूर्ण झाल्या आहेत. लवकरच भारतीय सैन्य दलात याचा समावेश केला जाणार आहे.
अग्नी प्रकारातील क्षेपणास्त्र व त्याची मारक क्षमता
अग्नी १ ७०० ते १२०० किमी मारक क्षमता
अग्नी २ २००० ते ३५०० किमी मारक क्षमता
अग्नी 3 ३००० ते ५००० किमी मारक क्षमता
अग्नी ४ ३५०० ते ४००० किमी मारक क्षमता
अग्नी ५ ५००० ते ८००० किमी मारक क्षमता
अग्नी ६ ११००० ते १२००० किमी मारक क्षमता(विकास प्रक्रीयेखाली)