गावठाण मिळकतींचे ड्रोनव्दारे सर्वेक्षण व भूमापन प्रकल्प यशस्वीपणे राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:16 AM2021-02-06T04:16:41+5:302021-02-06T04:16:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील गावांच्या गावठाणातील जमिनींचे जीआयएस आधारित सर्वेक्षण व भूमापन करण्यासाठी गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील गावांच्या गावठाणातील जमिनींचे जीआयएस आधारित सर्वेक्षण व भूमापन करण्यासाठी गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी महसूल व भूमि अभिलेख यंत्रणांनी अचूकपणे व जबाबदारीने कामे करावीत तसेच जमाबंदी प्रकल्प ‘ड्रोन सर्व्हे’ करत असताना सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करून प्रकल्प यशस्वीपणे राबवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात गावठाण जमाबंदी प्रकल्पाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख राजेंद्र गोळे आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले की, गावठाण जमाबंदी प्रकल्प योजनेत भारतीय सर्वेक्षण विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने गावठाणातील मिळकतींचे सर्वेक्षण करून गावठाणातील मिळकतीचा ‘डिजिटाईज्ड’ नकाशा तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार ड्रोनच्या सहाय्याने करण्यात येणाऱ्या गावठाण मोजणीसाठी निवडलेल्या गावांचे नियोजन करावे व ड्रोनव्दारे गावठाण मोजणीची प्रक्रिया समन्वयाने पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख राजेंद्र गोळे म्हणाले, महसूल, भूमी अभिलेख व ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प अंतर्गत १ हजार १८४ गावात ड्रोन सर्व्हे करण्यात येणार आहे. पुरंदर, हवेली व दौंड तालुक्यात सर्वेक्षणाला सुरूवात झाली आहे.