भविष्यात अशी वेळ कोणावरही येऊ नये; डीजेवर बंदी आणावी, कान गमावलेल्या सागरचे भावनिक आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 05:02 PM2024-09-25T17:02:12+5:302024-09-25T17:02:26+5:30
एक कानाने ऐकू येत आहे, दुसऱ्या कानात शिट्टी वाजतीये, अजूनही डीजेचा आवाज कानात घुमतोय, अधूनमधून असं चक्कर आल्यासारखं होतंय
पुणे: पुण्यात गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर स्पीकरच्या भिंती उभारण्यात आल्या होत्या. कर्णकर्कश स्पीकर आणि आवाजाच्या दणक्याने नागरिक हैराण झाले होते. विसर्जन मिरवणुकीच्या अगोदर जनजागृती करूनही मंडळांनी ऐकले नाही. त्यानंतर नागरिकांना अनेक आरोग्याच्या समस्या उदभवल्याचे समोर आले आहे. अशातच वसंत मोरेंचे कार्यकर्ते सागर मोरे यांना या डीजेमुळे एक कान गमवावा लागला आहे. भविष्यात अशी वेळ कोणावरही येऊ नये. डीजेवर बंदी आणायला हवी असे भावनिक आवाहन सागर यांनी केले आहे. एका माध्यमाच्या चॅनेलशी संवाद साधताना त्यांनी भावना व्यक्त केली आहे.
सागर मोरे हे घरातील कर्ता पुरुष आहेत. त्यांच्या वडिलांचे वय झालं आहे. त्यांचे लग्न झाले असून लहान दोन मुलीसुद्धा आहेत. आता त्यांनी एक कान गमावला आहे. पुढं घराचं कस होणार? पोरींकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्न त्यांना पडला आहे. विसर्जनाच्या दिवशी नेमकं काय घडलं हे सागर यांनी सांगितलं आहे.
मी डीजेच्या समोर नाचत होतो. चार तास तिथेच होतो. तेव्हा काही जाणवलं नाही. चारही बाजूने डीजे कात्रज चौकात आले. अर्धा पाऊण तास एका चौकात ते वाजवत होते. त्यावेळी काही जाणवलं नाही. थोड्या वेळाने कात्रज तलावाजवळ गेल्यावर काहीच ऐकू येत नव्हतं. त्यानंतर मी वसंत मोरेंशी संपर्क साधून भारती हॉस्पिटलला गेलो. दवाखान्यात गेल्यावर एक कान ९५ टक्के डॅमेज झाला होता. तर दुसरा ६० टक्के डॅमेज झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मी सध्या एक कान गमावला आहे. दुसऱ्या कानाने ७० टक्के ऐकू येतंय. वेळेत दवाखान्यात गेल्याने डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरु केले. त्यामुळे एका कानाला ७० टक्के फरक पडला. दुसऱ्या कानाने अजूनही ऐकू येत नाहीये. भविष्यात अशी कोणावरही वेळ येऊ नये. माझ्याबाबतीत जे काही घडलं ते कोणाच्या बाबतीत हे घडू नये. डीजेवर बंदी आणायला हवी.
म्हणून थोडंफार कव्हर झालं
आता कानात शिट्टी वाजत आहे. अजूनही डीजेचा आवाज कानात घुमतोय. अधूनमधून असं चक्कर आल्यासारखं होतंय. दोन तीन दिवस मला कोण काय बोलतंय हे कळत नव्हतं. घरातले लोक मला पानावर लिहून देत होते. डॉक्टरांनी कान व्यवस्थित होईल अशी गॅरंटी दिली नाही. पण औषध घ्यायला सांगितलं आहे. कान व्यवस्थित व्हायला थोडं उशिरा होईल असंही सांगितल आहे. वेळेत दवाखाना केला म्हणून थोडंफार कव्हर झाल्याचे सागर यांनी सांगितलं आहे.