‘आधार’चा असाही आधार
By admin | Published: October 1, 2015 12:46 AM2015-10-01T00:46:23+5:302015-10-01T00:46:23+5:30
आधार कार्डामुळे शासकीय अनुदान बँक खात्यात जमा होईल, इथंपासून यापुढील अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक असल्याचे सांगितले जाते़
मुंढवा : आधार कार्डामुळे शासकीय अनुदान बँक खात्यात जमा होईल, इथंपासून यापुढील अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक असल्याचे सांगितले जाते़ पण, एका २० वर्षीय मूकबधिर ‘कोमल’ला आधार कार्डामुळे तिचे माता-पिता मिळाल्याची घटना पुण्यात घडली़
मुंढवा येथील ‘माझे घर’ शासकीय महिला वसतिगृह संस्थेत कोमल नावाची मूकबधिर मुलगी दोन वर्षांपासून राहात आहे. तिला एका कंपनीत नोकरी मिळाली. कंपनीचा पगार जमा करण्यासाठी तिला बँकेत खाते काढण्यासाठी आधार कार्डाची गरज भासली. आधार कार्ड काढले, तेव्हा तिचे खरे नाव व पत्त्याचा शोध लागला. त्या पत्त्यावरून तिच्या घरच्यांशी संपर्क झाला व तिच्या आईवडिलांना आपल्या मुलीची ख्यालीखुशाली संस्थेनी सांगितली व तिला नेण्यासाठी आंमत्रण दिले. मूकबधिर मुलीला आईवडील भेटले.
पुणे रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर-२ वर राजेंद्र तुपे या व्यक्तीला मूकबधिर मुलगी दिसली, त्याने लोहमार्ग पोलिसांना हे कळविले व ती मुलगी पुणे लोहमार्ग पोलीस नाईक के. एस. खैरे यांच्या ताब्यात दिली. ही घटना १४ आॅगस्ट २०१३ रोजी घडली. पोलिसांनी तिला मुंढव्यातील ‘माझे घर’मध्ये दाखल केले. तेव्हापासून ती मुलगी येथे राहू लागली. संस्था अशा निराधार मुलींचे नामकरण करते, यात त्या मुलीचे कोमल नाव ठेवले. कोमलला फेब्रुवारी २०१५ मध्ये मुंढवा येथील संजीवनी डिझास्टर इक्विपमेंट येथे नोकरी मिळाली़ कोमल येथे काम करीत असल्यामुळे तिचा पगार बँकेत जमा करावयाचा होता़ त्यासाठी तिचे बँकेत नवीन खाते काढायची गरज भासली. त्यासाठी संस्थेने तिचे आधार कार्ड काढले. दोन महिने झाले तरी कोमलचे आधार कार्ड आले नसल्याने ‘माझे घर’ शासकीय महिला वसतिगृह अधीक्षक एल. एस. खाडे यांनी याबाबत आधार कार्ड केंद्रावर चौकशी केली. यात कोमलने अगोदरही कार्ड काढले असल्याचे समजले. तिला बोलता येत नसल्यामुळे तिच्या पूर्वीच्या आधार कार्डविषयी ती काहीच सांगू शकत नव्हती. मुंढव्यातील महा-ई-सेवाकेंद्राचे चालक प्रकाश बोलभट व भानुदास पानमंद यांनी कोमलच्या हाताच्या बोटांच्या ठशांवरून तिचे अगोदर काढलेले आधार कार्ड मिळविले. या आधार कार्डवर तिचे खरे नाव व पत्ता मिळाला. यावरून कोमल हिचे खरे नाव व्यंकटम्मा सोमेस्वराबंडा (जन्म तारीख १.१.१९९५) रा. उतकुर, मल्लेपल्ली, आंध्र प्रदेश असे आहे. या माहितीचा आधार घेऊन खाडे यांनी ‘जस्ट डायल’ कंपनीशी संपर्क साधून तिच्या मूळ गावातील पोलीस स्टेशनचा फोन नंबर मिळविला व पोलिसांच्या व्हॉटस्पवर तिच्या आधार कार्ड वरील फोटो पाठविला व ती आमच्या संस्थेत गेल्या दोन वर्षापासून राहात आहे. तिच्या आईवडिलांना आम्ही शोधत आहोत, असे सांगितले. तेथील पोलिसांनी आईवडिलांचा तपास करून त्यांचा संपर्क संस्थेस करून दिला. व्यंकटम्माच्या नातेवाइकांशी खाडे यांनी मोबाईल वरून संपर्क साधला. ‘तुम्हाला किती मुली, घरात कोण कोण राहता, तुम्ही काय करता’ यावर चर्चा केल्यानंतर यात ही मुलगी त्यांचीच असल्याचे समजले. चौकशी केल्यानंतर तिच्या आईवडिलांना मुंढवा येथील ‘माझे घर’ शासकीय महिला वसतिगृह येथे येण्यास सांगितले. हा सर्व खटाटोप गेल्या तीन-चार दिवसांपासून चालू होता. आज व्यंकटम्मा हिची आई, भाऊ, काका व मामा संस्थेत आले. व व्यंकटम्माला दोन वर्षांनी भेटले व सोबत नेले. आईला मुलगी भेटल्या नंतर व्यंकटम्माच्या आईचे डोळे पाणावले. मुलीला दोन वर्षांनंतर भेटून आईला आनंद झाला. (वार्ताहर)