...असे प्रकार कदापि खपवून घेतले जाणार नाही : पुणे पोलीस आयुक्तांचा गर्भित इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2020 12:14 PM2020-11-07T12:14:18+5:302020-11-07T12:15:28+5:30
गुन्हेगारांमध्ये पोलिसांविषयी भीती असलीच पाहिजे तसेच नागरिकांनाही पोलिसांबद्दल आदरपुर्वक भीती असायला आहे..
पुणे : गुन्हेगारांमध्ये पोलिसांविषयी भीती असलीच पाहिजे तसेच नागरिकांनाही पोलिसांबद्दल आदरपुर्वक भीती असायला आहे. पोलिसांविषयी नागरिकांना आत्मविश्वास वाढावा, यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. मात्र, पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याला बोनेटवरुन फिरविल्याचा प्रकार घडला. असे प्रकार पुण्यात खपवून घेणार नाही, अशा कडक शब्दात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गर्भित इशारा दिला आहे.
पुणे पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गुप्ता यांनी शुक्रवारी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. संपादक प्रशांत दीक्षित आणि व्यवस्थापक मिलन दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले.
गुप्ता म्हणाले, आमचे पहिले उद्दिष्ट बेसिक पोलिसिंगवर राहणार आहे. गुन्हेगारांचा छडा लावून त्यांना अटक करुन शिक्षा होईल, हे पाहिल्यास गुन्हेगारीवर नियंत्रण राहू शकते. त्यासाठी तंत्रज्ञानाचा भरपूर वापर करण्याकडे आपला भर असणार आहे. त्यादृष्टीने सर्व घटकांमध्ये एकसुत्रता आणण्याचा आपला प्रयत्न आहे़ ज्या ठिकाणी आवश्यक आहे, तेथे अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बळ पुरविण्यात येत आहे. अशाप्रकारे ९३ पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयातून प्रत्यक्ष पोलीस ठाण्यांमध्ये आणण्यात आले आहे.पोलीस उपायुक्त, वरिष्ठ निरीक्षकांना अधिक स्वातंत्र्य देण्याबरोबरच जबाबदारी देण्यावर आपला भर आहे. त्याशिवाय त्यांना ते काम आपले वाटणार नाही.