ऑनलाईन वर्ग चुकविणाऱ्या विद्यार्थ्यांना अशी शिक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:08 AM2021-04-29T04:08:35+5:302021-04-29T04:08:35+5:30
पुणे : राज्यातील पहिली ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, एकही दिवस प्रत्यक्ष ...
पुणे : राज्यातील पहिली ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, एकही दिवस प्रत्यक्ष शाळेत आले नाहीत, ऑनलाईन वर्गांना उपस्थित राहिले नाहीत आणि कोणतीही परीक्षा दिली नाहीत, त्या विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वरच्या वर्गात त्यांना ढकलले जाईल आणि गुणपत्रिकांवर केवळ ‘वर्गोन्नती’ असा शेरा असेल. परंतु, संपूर्ण गुणपित्रका कोरी असणार आहे. यामुळे राज्यातील सर्व शाळांचा निकाल यंदा शंभर टक्के लागणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पहिली ते आठवी आणि नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना ‘वर्गोन्नती’ देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यासाठी कोणत्या मूल्यांकन पद्धतीचा वापर करावा, याबाबतची स्पष्ट माहिती राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केली. परंतु, सर्व शाळांत एकसारख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल तयार करताना शिक्षकांना अडचणी येत आहेत. परंतु, उपलब्ध माहितीच्या आधारे संबंधित शाळेच्या परीक्षा समितीने निकाल जाहीर करण्याबाबत निर्णय घ्यावा, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.
-------------------
निकाल तयार करण्याबाबत शासनाने सविस्तर परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे काही शाळांनी वेगवेगळ्या पद्धतीने मूल्यमापन केले असले तरी निकाल जाहीर करता येऊ शकतो. परंतु, काही विद्यार्थी एकही दिवस ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने शाळांच्या वर्गांना उपस्थित राहिले नाहीत. तसेच त्यांनी कोणतीही परीक्षा दिली नाही, अशा विद्यार्थ्यांचासुद्धा यंदा उत्तीर्ण केले जाणार आहे. या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका पूर्णपणे कोऱ्या असतील. त्यावर फक्त वर्गोन्नतीचा शेरा दिलेला असेल.
- महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक महासंघ
-------
निकालाची तारीख निश्चित
दरवर्षी सर्वसाधारणपणे १ मे रोजी निकाल जाहीर केला जातो. मागील वर्षी कोरोनामुळे शासनाने १० मे रोजी निकाल तयार करून वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, अद्याप निकाल जाहीर करण्याची तारीख शासनाने दिलेली नाही. त्यामुळे निकाल केव्हा लागणार याबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.