.... बडी मुश्किल से दुनिया में ऐसे‘दोस्त’मिलते है!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 06:45 PM2019-03-23T18:45:51+5:302019-03-23T18:51:48+5:30
निलेशच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची. वयोवृद्ध आईवडील, धाकटा भाऊ. अपघातानंतर निलेशच्या आजारपणाला कंटाळून त्याची पत्नीही छोट्या मुलाला सोबत घेऊन माहेरी निघून गेली.
पौड : जगात रक्ताच्या नात्यांपेक्षाही जास्त महत्व मैत्रीला देण्यात आले आहे. पण संकटकाळी या मैत्रीची खरी ओळख प्रत्येकाला होत राहते. या नात्याला अनुसरुन अनेक प्रसंग आजूबाजूला घडत असतात. मैत्री मैत्री म्हणजे नेमकं काय असते त्याचा अनुभव देणारी ही हृदयदावक घटना .. गडदावणे (ता. मुळशी) येथील निलेश रावडे चा चार वर्षांपूर्वी दुचाकीवरून जात असताना भुगाव येथे अपघात झाला. या अपघातात निलेशच्या शरीराची उजवी बाजू निकामी झाली. डोक्याला मार लागल्याने त्याच्यावर तीनवेळा शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. नातेवाईक मंडळींच्या अथक प्रयत्नाने निलेशचे प्राण वाचले खरे पण या अपघातात निलेशचा उजवा हात व पाय मात्र कायमचा निकामी झाल्याने त्याला अपंगत्व आले. त्यामुळे आर्थिक बाजू कमकुवत झाली. परंतु, निलेशच्या वर्गमित्रांनी त्याला आर्थिक आधार दिला आहे.
निलेशच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची. वयोवृद्ध आईवडील, धाकटा भाऊ. अपघातानंतर निलेशच्या आजारपणाला कंटाळून त्याची पत्नीही छोट्या मुलाला सोबत घेऊन माहेरी निघून गेली. अपंगत्व आलेल्या निलेशचा सारा भार वृद्ध माता पिता व त्याच्या छोट्या भावावर आला. त्याच्या छोट्या भावाने नोकरी करून त्याच्या उपचाराचा खर्च सांभाळला.आपल्या मोठ्या भावावर योग्य उपचार व्हावेत त्याची योग्य काळजी घेतली जावी याकरिता स्वत:चे लग्न करण्याचे पुढे ढकलले. निलेशची प्रकृती आता स्थिर असली तरी तो आता कोणताच काम धंदा करू शकत नाही. तो पूर्णपणे आपल्या कुटुंबियांवर अवलंबून आहे. निलेशच्या अपघाताची व सद्यस्थितीची माहिती तब्बल चार वर्षानंतर सोशल मीडियाच्या माध्यमाने त्याच्या काही वर्ग मित्रांना समजली. त्यातून या वर्गमित्रांनी आपण एकत्र येऊन निलेशला काही ना काही मदत करायला हवी या विचाराने एकत्र येण्याचे जमेल त्याने जमेल तेवढी आर्थिक मदत उभी करण्याचे आवाहन केले. १९९५ साली पौड येथील शिवछत्रपती विद्यालयात दहावीत शिकणाऱ्या निलेशच्या ४५ वर्ग मित्र-मैत्रिणींनी एकत्र येऊन सुमारे १,६०,००० रुपयांची आर्थिक मदत उभी केली. ती निलेशच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केली. आपल्या संकट समयी तब्बल २४ वर्षांनंतर आपले वर्गमित्र आपल्याला भेटण्यासाठी व मदत करण्यासाठी एकत्र आलेले पाहून निलेशला अश्रू अनावर झाले. त्याच्या वृद्ध मातापित्यानाही आपल्या निलेशच्या मित्रांचे मित्रप्रेम पाहून गहिवरून आले.
यावेळी बोलताना, 'निलेश तू एकटा नाहीस आम्ही सर्वजण तुज्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.'अशा प्रतिक्रिया त्याच्या वर्गमित्रांनी दिल्या.हे सारे निलेश व त्याच्या आई-वडिलांना जगण्याची नवी उभारी देणारे आहे.
संपर्कात नसलेल्या आपल्या अन्य वर्गमित्रांचे पत्ते शोधणे, मोबाईल नंबर मिळविणे व या घटनेची माहिती त्यांना देणे,संपर्क करणे, मदतीचे आवाहन करणे याकरिता राहुल बलकवडे, गणेश मांडेकर, गणेश धुमाळ, मृणाल ईगावे, शेट्ये, यांनी विशेष परिश्रम घेतले.