असे आहे डावखुऱ्या व्यक्तींचे ‘उजवे’पण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:14 AM2021-08-13T04:14:38+5:302021-08-13T04:14:38+5:30

पुणे : ‘तू डावखुरा/डावखुरी आहेस? कसं काय जमतं बुवा उलट्या हाताने कामे करायला?’ डावखुऱ्या व्यक्तींवर येऊन सर्रास आदळणारा हा ...

Such is the ‘right’ of leftists! | असे आहे डावखुऱ्या व्यक्तींचे ‘उजवे’पण!

असे आहे डावखुऱ्या व्यक्तींचे ‘उजवे’पण!

Next

पुणे : ‘तू डावखुरा/डावखुरी आहेस? कसं काय जमतं बुवा उलट्या हाताने कामे करायला?’ डावखुऱ्या व्यक्तींवर येऊन सर्रास आदळणारा हा प्रश्न! डावखुरेपणा ही खरं तर निसर्गदत्त देणगी आहे. डावखुऱ्या व्यक्ती अधिक सर्जनशील असतात, असे म्हटले जाते. अभिनेत्री, खेळाडू, डॉक्टर अशा अनेकांनी आपण डावखुरे असूनही त्यांनी आपापल्या क्षेत्रात ‘उजवे’ असल्याचे सिद्ध केले आहे.

डावखुऱ्या लोकांची जगातील संख्या एकूण लोकसंख्येच्या केवळ १० टक्के इतकी आहे. डावखुरेपणाबद्दलचे गैरसमज दूर व्हावेत आणि जागृती व्हावी, यासाठी दर वर्षी १३ आॅगस्ट रोजी ‘आंतरराष्ट्रीय डावखुरे दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त विविध क्षेत्रांतील डावखुऱ्या व्यक्तींशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला. त्या वेळी आपले अनुभव कथन करतानाच डावखुऱ्या मुलांच्या पालकांनी त्यांना नैसर्गिक पध्दतीने कामे करु द्यावीत, त्यांच्यावर उजवा हात वापरण्याची जबरदस्ती करु नये, असा मोलाचा सल्लाही दिला.

-----------------

मी डावखुरी असल्याचे लक्षात आल्यावर माझ्या आई-वडिलांनी कधीच माझ्यावर दुसरा हात वापरण्याची जबरदस्ती केली नाही. केवळ उजव्या हाताने जेवावे, एवढीच आईची इच्छा असायची. मला अजूनही चमच्याने खाताना ग्रीप येत नाही. अभियन करतानाही मी आत्मविश्वासाने डाव्या हाताचाच वापर करते. केवळ धार्मिक दृश्याचे चित्रीकरण असेल आणि दिग्दर्शकांनी सांगितल्यास मी जाणीवपूर्वक उजवा हात वापरते. मात्र, पेन वापरताना, अथवा इतर कामे करताना डाव्या हाताचाच वापर करते. डावखुरे असल्याची अडचण केवळ नृत्य शिकताना होते. नृत्याच्या सगळया स्टेप उजवी बाजू धरुन ठरवलेल्या असतात. त्यामुळे मला स्टेप शिकताना अडचण येते. डावखुरेपणा ही निसर्गदत्त देणगी आहे. त्यामुळे मी पालकांना सांगू इच्छिते की, तुमची मुले डावखुरी असतील तर त्यांच्या सवयीचा आदर करा, त्यांना सवयीच्या विरोधात काहीही करायला सांगू नका.

- तेजश्री प्रधान, कलाकार

----------------------

मी डावखुरे असल्याचा मला कोणताही तोटा झाला नाही, उलट फायदाच झाला. कोणत्याही क्रीडा प्रकारामध्ये डावखुरे असणे लाभदायक ठरते. आपले डावपेच आखणे सोपे जाते. टेनिसमध्ये मला डावखुरे असणे पथ्यावर पडले. प्रतिस्पर्ध्याला आपल्या डावपेचांचा पटकन अंदाज येत नाही. टेनिसमध्ये वाईड सर्व्हिस टाकताना अँगल वेगळा असल्याचा फायदा होतो. त्यामुळे डावखुरे असणे ही कायम संधीच ठरली.

- नितीन किर्तने, टेनिसपटू

------------------------

डावखुऱ्या लोकांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे दोन्ही हातांचा वापर करता येतो. वैद्यकीय व्यवसायातही अशा पध्दतीची सर्व प्रकारची उपकरणे उपलब्ध आहेत. मला आईने लहानपणी उजव्या हाताने लिहायची सवय लावली. त्यामुळे मी दोन्ही हातांनी लिहू शकतो, चित्रेही काढू शकतो. डावखुरेपणा हा न्यूनगंड नाही. डावखुऱ्या व्यक्ती सर्जनशील, कलावंत असतात. त्यामुळे डावखुरेपणा ही आनंदाची बाब आहे आणि ती विकसित करण्यावर पालकांनी भर द्यायला हवा.

- डॉ. के. एच. संचेती, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ

---------------------------

आई-बाबा डॉक्टर असल्याने माझ्या डावखुरे असल्याचा त्यांनी इश्यू केला नाही. डाव्या हाताने लिही, असे शाळेत बाई म्हणायच्या, तेव्हा आईने त्यांना भेटून समजून सांगितले. माझी दोन्ही मुलेही डावरी आहेत. आम्ही युरोपला गेलो असताना बहीण एका दुकानात घेऊन गेली होती. डावखुऱ्या लोकांना वापरण्यायोग्य अनेक वस्तू तेथे होत्या. मी दोघांसाठी तिथून कात्री विकत घेतली. पूर्वीच्या तुलनेत आता डावखुरेपणाला ग्लॅमर आले आहे, पालक बऱ्यापैकी जागरूक झाले आहेत, ही समाधानाची बाब आहे.

- मुक्ता पुणतांबेकर, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र

Web Title: Such is the ‘right’ of leftists!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.