पक्षांतराची अशीही कुरघोडी
By admin | Published: January 14, 2017 03:49 AM2017-01-14T03:49:37+5:302017-01-14T03:49:37+5:30
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पक्षांतराचे वारे सुरू झाले आहे. पक्षात येताना वेगवेगळी आश्वासने दिली जातात. परंतु, पक्षाचे
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पक्षांतराचे वारे सुरू झाले आहे. पक्षात येताना वेगवेगळी आश्वासने दिली जातात. परंतु, पक्षाचे जुने कार्यकर्ते, इतरांना दिलेला शब्द यामुळे पक्षाकडून नंतर आश्वासने पाळलीच जातात, असे नाही. पण, काही कार्यकर्ते भलतेच वस्ताद निघतात. शहराच्या पूर्व भागातील ज्येष्ठ नगरसेवक असलेल्या कार्यकर्त्याने दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला. त्याला ‘उमेदवारीचे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र, नंतर पक्षाकडून दुसऱ्या उमेदवाराच्या नावाची चर्चा सुरू झाली. या नगरसेवकांना दुसरा पर्याय देण्यात आला. प्रभागातील महिला राखीव जागेवरून त्यांच्या सुनेला उभे करण्यास सांगण्यात आले. त्यांनी याला अगोदर तयारी दर्शविली; परंतु राजकारणात अनेक वर्षे मुरलेल्या या नगरसेवकाने चक्रे फिरवायला सुरुवात केली. प्रभागातीलच एका विद्यमान नगरसेविकेला या पक्षाकडे वळविण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. त्याला यशही मिळाले. त्यामुळे आता या नगरसेवकांची उमेदवारी
निश्चित होणार आहे. मात्र, यामुळे अनेक इच्छुकांनी चांगला धडा घेतला आहे. पक्षांतर करताना अनेक आश्वासने दिली जातात; पण सध्या चुरस जोरदार आहे. त्यामुळे एखादा
‘सवाई’ भेटला, की मागच्यांच्या नशिबी वनवासच येतो. त्यामुळे घाई करायची नाही, सगळ्यांनी
पत्ते ओपन केल्याशिवाय आपण निर्णय घ्यायचा नाही. नाही तर पक्षांतर करून जुन्या पक्षाला रामराम ठोकायचा आणि नव्यामध्येही संधी
मिळायची नाही. - फिरस्ता