Pune Crime: ६ दुचाकीवरील १३ हल्लेखोरांचा बेसावध आंदेकरांवर अचानक हल्ला; पुण्यातील थरारक CCTV फुटेज समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 10:51 AM2024-09-02T10:51:00+5:302024-09-02T10:51:25+5:30

सुरुवातीला एकाने आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. एकापाठोपाठ एक अशा पाच गोळ्या त्यांच्यावर झाडल्या.

sudden attack on vanraj Andekar by 13 youth on two wheelers CCTV footage video from Pune | Pune Crime: ६ दुचाकीवरील १३ हल्लेखोरांचा बेसावध आंदेकरांवर अचानक हल्ला; पुण्यातील थरारक CCTV फुटेज समोर

Pune Crime: ६ दुचाकीवरील १३ हल्लेखोरांचा बेसावध आंदेकरांवर अचानक हल्ला; पुण्यातील थरारक CCTV फुटेज समोर

किरण शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे

रविवारी रात्री पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा निर्घृण खून करण्यात आला आहे. नाना पेठेतील आंदेकर चौकात वनराज आंदेकर चुलत भावासोबत थांबले होते. रात्री साडेनऊची वेळ होती. बेसावध आंदेकर गप्पा मारत असताना काही समजण्याच्या आतच सहा दुचाकींनी त्यांना गराडा घातला. या दुचाकीवरून आलेल्या १३ जणांनी आंदेकर यांना घेरलं. सुरुवातीला त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात वनराज आंदेकर यांचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व थरार जवळच असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. नाना पेठेसारखा गजबजलेल्या भागात रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. एरवी मित्रांच्या गराड्यात असणारे वनराज आंदेकर रविवारी मात्र चुलत भावासोबत थांबले होते. जवळच त्यांचं घर होतं आणि घरापासून चालत चालत ते मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या चौकात आले होते. हल्लेखोर त्यांची वाट पाहत दबा धरूनच बसले होते. मोकळ्या जागेत वनराज आंदेकर येताच ६ दुचाकी त्यांच्या दिशेने आल्या.

सुरुवातीला एकाने आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. एकापाठोपाठ एक अशा पाच गोळ्या त्यांच्यावर झाडल्या. अचानक झालेल्या हल्ल्याने वनराज आंदेकर गडबडले. त्यांनी पळून जाण्याचाही प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरासमोर त्यांचा टिकाव लागला नाही आणि ते त्यांच्या हाती लागले. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्यानेही वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून नंतर मारेकर्‍यांनी पळ काढला. हल्ल्याचा हाच संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

दरम्यान, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वनराज आंदेकर यांना जवळच असणाऱ्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात नेण्यांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांची ओळख पटल्यानंतर त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी जयंत लक्ष्मण कोमकर आणि गणेश लक्ष्मण कोमकर या दोघांना अटक केली होती. मात्र समोर आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तब्बल १३ जण या संपूर्ण कटात सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी समोर येते. कौटुंबिक कारणावरून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते.पुणे पोलीस या संपूर्ण घटनेचा आता सखोल तपास करत आहेत..
 

Web Title: sudden attack on vanraj Andekar by 13 youth on two wheelers CCTV footage video from Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.