Exercise: व्यायाम करतानाच अचानक मृत्यू; कुस्तीगीर आणि वैद्यकीय तज्ज्ञ सांगतायेत 'ही' कारणे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 03:40 PM2022-03-17T15:40:09+5:302022-03-17T15:40:22+5:30

पुणे : व्यायाम करतानाच अचानक मृत्यूने गाठण्यामागे वैद्यकीय तपासणीचा अभाव, व्यायामाचा अतिरेक तसेच शरीर सुडौल करण्यासाठीचे सप्लिमेंटरी फूड हीच ...

Sudden death while exercising Medical experts say reasons | Exercise: व्यायाम करतानाच अचानक मृत्यू; कुस्तीगीर आणि वैद्यकीय तज्ज्ञ सांगतायेत 'ही' कारणे

Exercise: व्यायाम करतानाच अचानक मृत्यू; कुस्तीगीर आणि वैद्यकीय तज्ज्ञ सांगतायेत 'ही' कारणे

googlenewsNext

पुणे : व्यायाम करतानाच अचानक मृत्यूने गाठण्यामागे वैद्यकीय तपासणीचा अभाव, व्यायामाचा अतिरेक तसेच शरीर सुडौल करण्यासाठीचे सप्लिमेंटरी फूड हीच कारणे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. वैद्यकीय तपासणी केल्याशिवाय व्यायाम सुरू करूच नका, असे त्यांनी सांगितले.

पुनवळे येथे मंगळवारी सकाळी व्यायाम करतानाच अनमोल गोजा या २३ वर्षे वयाच्या युवकाचा अचानक मृत्यू झाला. गत एक-दोन वर्षांत अशा घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. खाताना आपण पचेल तितकेच खातो, मग व्यायाम करतानाच शरीराचा काहीच विचार न करता अतिरेक का करतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचेच नाही तर व्यायाम मार्गदर्शकांचे म्हणणे आहे. जुने कुस्तीगीर रोज हजारपेक्षा जास्त जोर बैठका मारायचे, पण त्या व्यायामाला शिस्तही आहे असे काही जुन्या कुस्तीगीर वस्तादांनी सांगितले. जोर लावताना आपण आपलेच वजन पुढे नेतो, बैठका मारताना ते वर आणतो, त्यामुळे त्याचा त्रास होत नाही, असे हे वस्ताद म्हणाले.

''व्यायामालाही शिस्त हवी असते. त्याचबरोबर हल्ली मसल्स वाढवण्यासाठी म्हणून सप्लिमेंटरी फूड म्हणजे वेगवेगळ्या पावडरी दिल्या जातात. त्या शरीराला घातक आहेत. त्यामुळे शरीरात वेगवेगळे अनैसर्गिक बदल होतात व त्याचा परिणाम म्हणून असे प्रकार घटतात. मार्गदर्शकाशिवाय व्यायाम करणेही चुकीचे आहे.'' - अप्पा रेणुसे, कुस्तीगीर

''व्यायाम सुरू करताना त्यासाठी आधी शरीराला तयार, वॉर्मअप करावे लागते. थेट पळणे किंवा वजन उचलणे अशा गोष्टी केल्या जातात. सराव नसतानाही अचानक व्यायाम सुरू करण्यात येतो. या गोष्टी शरीराला त्रासदायक आहेत. त्याचा अतिरेक झाला की अशा घटना घडतात.'' - विलास कथुरे, राष्ट्रीय मार्गदर्शक, कुस्ती.

''व्यायाम सुरू करण्याआधी तरुणांपासून ते चाळिशीनंतरच्या लोकांनीही वैद्यकीय तपासणी करणे अतिशय गरजेचे आहे. हृदयाशी संबधित अनेक आजार वरून काहीच दिसून येत नाहीत, त्याचा त्रासही होत नाही, मात्र व्यायामाने त्यावर ताण आला की ते मग जगण्याची संधीही देत नाहीत. मद्यप्राशन, धुम्रपान तसेच कोणतेही व्यसन असलेल्यांचे शरीर आधीच नाजूक झालेले असते. त्यांनी तर व्यायामाला सुरुवात करण्याआधी अशी तपासणी केलीच पाहिजे.''-  डॉ, कल्याण गंगवाल- जनरल फिजिशियन

Web Title: Sudden death while exercising Medical experts say reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.