राजीव सातव यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:10 AM2021-05-16T04:10:38+5:302021-05-16T04:10:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती शुक्रवारी (दि. १४) रात्री अचानक बिघडली. डॉक्टरांनी त्वरित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती शुक्रवारी (दि. १४) रात्री अचानक बिघडली. डॉक्टरांनी त्वरित औषधोपचार सुरू केल्यानंतर शनिवारी (दि. १५) दिवसभरात सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले.
कोरोनाबाधित झाल्याने सातव जहांगीर रुग्णालयात दाखल आहेत. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. ते नुकतेच कोरोनामुक्तही झाले. ते औषधांंना योग्य प्रतिसाद देत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. सत्यपालसिंग यांनी सांगितले होते. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी रुग्णालयाशी संपर्क ठेवून असल्याची माहिती मिळाली.
त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जात होते. असे असताना शुक्रवारी रात्री अचानक त्यांची तब्बेत बिघडली. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांंनी शुक्रवारीच रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली होती. रात्री तब्येत बिघडल्याचे समजल्यावर त्यांनी पुण्यातच मुक्काम केला. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही शनिवारी रुग्णालयात जाऊन सातव यांच्या तब्येतीची माहिती घेतली.
“सातव यांची प्रकृती स्थिर आहे. ते औषधांना प्रतिसाद देत आहेत. ते लवकर बरे होतील,” असा विश्वास ज्येष्ठ कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला. सातव यांच्या आई रजनी सातव शनिवारी सकाळीच हिंगोलीहून पुण्यात आल्या आहेत. सातव यांचे हिंगोली, पुण्यातील बरेच निकटचे कार्यकर्तेही रुग्णालयात दिसत आहेत. सर्वांचे चेहरे काळजीग्रस्त असून परमेश्वराने सातव यांना लवकर बरे करावे अशी प्रार्थना ते करत आहेत.
चौकट
काय आहे नवा विषाणू?
आणखी एका विषाणूने सातव यांना गाठले?
सातव यांना सायटोमेगँलोव्हायरस या नव्या विषाणूची लागण झाली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. या विषाणूबाबत विचारले असता राज्याचे माजी आरोग्य संचालक व कोरोनाकृती दलाचे सदस्य डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले, “हा नवा नाही तर जुनाच विषाणू आहे. तोही संसर्गजन्य आहे. प्रौढांपेक्षा लहान मुलांसाठी तो धोकादायक आहे. यावरची परिणामकारक औषधे उपलब्ध आहेत. त्याच्या संसर्गातून माणूस बरा होतो.” कोरोनामुळे सातव यांच्या फुप्फुसाची क्षमता आधीच कमी झाल्याने सातव यांना या विषाणूची लागण झाली असावी असा अंदाज डॉ. साळुंखे यांनी व्यक्त केला. याला ‘को-इन्फेक्शन’ म्हणतात. कोरोना आणि या विषाणूचा परस्पर संबंध नाही. कोरोना झाला की याचाही संसर्ग होतो असेही नाही, असे डॉ. साळुंखे यांनी स्पष्ट केले.