पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात अचानक पाणीपुरवठा बंद; नागरिकांचा मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 04:09 PM2023-07-03T16:09:33+5:302023-07-03T16:09:56+5:30
शहराच्या बऱ्याच भागात दुपारनंतर पाणीपुरवठा पूर्ववत
पुणे : पर्वती पंपीग स्टेशन येथील वीज पुरवठा खंडीत झाल्याने सोमवारी सकाळी शहराच्या मध्यवर्ती भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास पर्वती पंपीग स्टेशन येथील वीज पुरवठा खंडीत झाला. तो सकाळी साडेनऊच्या सुमारास सुरळीत झाला. त्यामुळे या दरम्यान पर्वती परिसर, शहरातील सर्व पेठा व लष्करच्या सर्व भागातील पाणी पुरवठा बंद पडला होता अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर यांनी दिली.
शहराच्या मध्यवर्ती भागात पेठांमध्ये सकाळी ८ ते ९ च्या सुमारास पाणी गेल्याने पुणेकरांचा मनस्ताप झाला. पुणे महापालिकेने दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद करण्याचे नियिजन केले आहे. पण असे अचानक पाणी गेल्याने नागरिकांना सकाळसकाळी कामात अडथळा निर्माण झाला. पाणीपुरवठा उशिरा सुरु झाल्याने नागरिकांना घरातून बाहेर पडण्यासही उशीर झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काहींना पाण्याची वाट बघत ताटकळत राहावे लागले. त्यामुळे नागरिक संतापल्याचे दिसून आले. दरम्यान एक तास पाणी पुरवठा बंद झाल्याने तो पूर्वरत होण्यासाठी सकाळी साडेनऊनंतर शहरातील बहुतांशी भागात तसेच लष्कर भागात दुपारपर्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. तर दुपारनंतर शहरातील पाणी पुरवठा पूर्ववत झाला आहे.