Corona Vaccination: पुणे जिल्हाधिकाऱ्यांची सलग ७५ तास लसीकरण मोहिमेला रात्री १२ वाजता अचानक भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 11:07 AM2021-10-12T11:07:34+5:302021-10-12T11:19:20+5:30
राज्यात सर्वाधिक लसीकरण झालेल्या पुणे जिल्ह्याचा लसीकरणाचा टक्का अधिक वाढविण्यासाठी व शंभर टक्के पात्र लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात "Mission Kavach Kundal" अभियान हाती घेण्यात आले आहे
पुणे : राज्यात सर्वाधिक लसीकरण झालेल्या पुणे जिल्ह्याचा लसीकरणाचा टक्का अधिक वाढविण्यासाठी व शंभर टक्के पात्र लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात "Mission Kavach Kundal" अभियान हाती घेण्यात आले आहे. या मोहिमेत सलग ७५ तास लसीकरण (vaccination) सुरु राहणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर वाघोली येथील प्राथमिक केंद्रात जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख, ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. भगवान पवार रात्री १२ वाजाता अचानक भेट दिली. सलग ७५ तास लसीकरण खरच सुरू आहे का याची त्यांनी पाहणी केली. त्यावेळी रात्री १२ नंतरही लसीकरण केंद्रावर गर्दी होती.
देशमुख म्हणाले, ''आपण गेली दीड वर्ष कोव्हीडशी लढतोय. राज्यात पुण्यानं लसीकरणात आघाडी घेतली असून सध्या आपण दुसऱ्या क्रमाकांवर आहोत. महानगपालिका, ग्रामीण भागात आपण विविध पद्धतीने लसीकरण मोहीम राबवली आहे. दिव्यांग, ट्रांसजेंडर, सेक्स वर्कर, बेडवर असणाऱ्या रुग्णांसाठी घरी जाऊन लसीकरण, आदिवासी भागातील लसीकरण, असे विविध उपक्रम राबवले आहेत.''
''साध्य आपण ७५ तास लसीकरण सुरु केले आहे. आजचा पहिला दिवस असून वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरु आहे. आतापर्यंत ६५० लोकांना लस देऊन झाली आहे. दिवसा काम करणारे नागरिक किंवा ज्यांची मुलं लहान आहेत असे आज इथे आलेले दिसत आहेत. मिशन कवच कुंडल अंतर्गत १० लाख लोकांचं लसीकरण करणार आहोत असही त्यांनी यावेळी सांगितले.''
मिशन कवच कुंडल मोहिम यशस्वी करण्यासाठी सप्तपदी
मिशन कवच कुंडलमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रामध्ये लसीकरण न झालेल्या सर्व लाभार्थ्यांना पहिली मात्रा व देय असलेल्या लाभार्थ्यांना दुसरी मात्रा लवकरात लवकर देण्यात येणार आहे. या सप्तपदीमध्ये सलग ७५ तास कोविड लसीकरण, कोविड लसीकरण आपल्या दारी, शंभर टक्के पहिला व सर्व शिल्लक देय दुसरा डोस, कोविड लसीकरणाने पूर्ण संरक्षित गाव, विक्रमी उद्दिष्ट ५ लक्ष लसीकरण, महिलांचे शंभर टक्के लसीकरण, खाजगी संस्थांचा सक्रीय सहभाग असे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. मिशन कवच कुंडल मोहिम यशस्वी करण्यासाठी सप्तपदी निश्चित करण्यात आली आहे.
पुणे जिल्हाधिकाऱ्यांची मिशन कवच कुंडल अंतर्गत सुरू झालेल्या सलग ७५ तास लसीकरण मोहिमेला रात्री १२ वाजता अचानक भेट pic.twitter.com/pdRvB1D4K1
— Lokmat (@MiLOKMAT) October 12, 2021
मिशन कवच कुंडल या अभियानाअंतर्गत उर्वरित नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन
जिल्ह्यात ८९८ खाजगी व १ हजार १६ शासकीय कोविड लसीकरण केंद्रे कार्यान्वित असून आहेत. एकंदरीत प्रशिक्षित मनुष्यबळाचा व खाजगी संस्थांचा सहभाग लक्षात घेता एकाच दिवसात ५ लक्ष लाभार्थ्यांचे कोविड लसीकरणाचे विक्रमी उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत ग्रामीण भागातील कोविड लसीकरणाचे अवलोकन केले असता, ८१ टक्के नागरिकांचे पहिला डोस व ४५ टक्के नागरिकांचे दुसरा डोस पुर्ण झाल्याचे निदर्शनास येत आहे. मिशन कवच कुंडल या अभियानाअंतर्गत उर्वरित नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन मोहिमेच्या यशस्वीतेसाठी कार्यक्षेत्रातील खाजगी स्वयंसेवी संस्था, खाजगी वैद्यकिय व्यावसायिक, नर्सिंग कॉलेजेस/शाळा, महाविद्यालये इत्यादींचा सहभाग घेण्यात येणार आहे.