पुण्याहून कोल्हापुरकडे जाणाऱ्या शिवशाही बसने कात्रज घाटात घेतला अचानक पेट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 01:11 PM2019-10-04T13:11:58+5:302019-10-04T13:14:52+5:30
चालकाच्या तत्परतेने अनर्थ टळला..
पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बस आणि दुर्घटना हे जणू समीकरणच बनले आहे. कात्रज भिलारेवाडीमध्ये याची प्रचिती पुन्हा एकदा पाहायला मिळाली.पुण्यावरून शिवशाही बस ( क्र. MH.12.E.8031) कोल्हापूरकडे जात होती. कात्रज घाटाच्या चढण मार्गावर इंजिन गरम झाल्यामुळे सकाळी दहा वाजता भिलारेवाडी येथील आर्यन स्कुलच्या समोर या गाडीने पेट घेतला. यामध्ये २९ प्रवासी होते. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पुण्यावरून शिवशाही बस कोल्हापूर कडे जात होती. कात्रज घाटाच्या चढण मार्गावर इंजिन गरम झाल्यामुळे सकाळी दहा वाजता या गाडीने पेट घेतला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी स्वारगेट डेपो वरुन ही बस कोल्हापूरला जात होती. कात्रज घाटाच्या चढण मार्गावर बस आल्यावर बस चे इंजिन गरम झाले आणि इंजिन मधून मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला. बस चालक लीबाती पांडुरंग खराते यांनी तात्काळ बस रस्त्याच्या कडेला घेतली. अग्निशामक केंद्राशी संपर्क साधला. कात्रज अग्निशामक केंद्रातील जवान फायरमन रामदास शिंदे, महादेव मांगडे, पकंज इंगवले, सागर इंगळे, निलेश तागुंदे, शुभम शिर्के, रुपेश जांबले यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गाडीमध्ये प्रवासी होते आणि धूर मोठ्या प्रमाणात होता म्हणून गाडीची काचा फोडून धूर बाहेर पडण्यास वाट करून दिली. आणि काही मिनिटात आगीवर नियंत्रण आणले.
दरम्यान, शिवशाही बसमध्ये २९ प्रवासी होते. चालकाच्या आग लागल्याचे लक्षात आले, त्याने लगेच अग्निशामक केंद्राला संपर्क साधला त्यामुळे मोठा अनर्थ टळला.