अचानक शेतातील झाडावर वीज कोसळली; आडोशाला बसलेल्या शेतकरी दाम्पत्याचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 07:16 PM2021-09-20T19:16:51+5:302021-09-20T19:17:16+5:30
बारामती तालुक्यातील कुरणेवाडी गावच्या हद्दीत सगोबाचीवाडी येथील घटना
बारामती : बारामती तालुक्यातील कुरणेवाडी गावच्या हद्दीत सगोबाचीवाडी येथील पणदरे खिंड जवळील शेतात काम करणाऱ्या शेतकरी दांपत्याचा वीजेने बळी घेतल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. पाऊस आल्याने झाडाच्या आडोशाला बसणे शेतकरी दांपत्याच्या जीवावर बेतले आहे.
बाळासाहेब बंडोबा घोरपडे (वय ५४) व त्यांच्या पत्नी संगीता बाळासाहेब घोरपडे (वय ४४) अशी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या शेतकरी दाम्पत्याची नावे आहेत. या घटनेत बाळासाहेब यांच्या दुसऱ्या पत्नी पद्ममिनी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर बारामती तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी तातडीने धाव घेत मदतकार्यात सहभाग घेतला.
घोरपडे यांची पणदरे खिंडीजवळ शेतजमीन आहे. सोमवारी बारामती शहर आणि तालुक्यात पावसाने चांगली हजेरी लावली. यावेळी शेतात काम करणारे हे तिघजण एका झाडाच्या आडोशाला बसले होते. याचवेळी अचानक वीजेचा मोठा कडकडाट होऊन वीज त्यांनी आसरा घेतलेल्या झाडावरच कोसळली. त्यात तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी बारामतीला हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच बाळासाहेब यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर काही वेळातच संगीता यांचाही मृत्यू झाला.या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.