सुधा भारद्वाज यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 09:02 PM2018-10-04T21:02:28+5:302018-10-04T21:05:39+5:30
शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेला माओवाद्यांनी पैसे पुरविल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये समोर आणले होते. याच अनुषंगाने देशभर पोलिसांचे धाडसत्र सुरू होते.
पुणे : सीपीआय या बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबध असल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल असलेल्या फरिदाबाद येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सुधा भारद्वाज यांनी पुणे येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.
शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेला माओवाद्यांनी पैसे पुरविल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये समोर आणले होते. याच अनुषंगाने देशभर पोलिसांचे धाडसत्र सुरू होते. त्यात सुरुवातील एल्गार परिषदेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी अॅड. सुरेंद्र गडलिंग, सुधीर ढवळे, रोना विल्सन, महेश राऊत आणि शोमा सेन यांना अटक केली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यानंतर पी. वरवरा राव, व्हर्णन गोन्सालवीस आणि अरूण थॉमस फरेरा यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयातही याबाबत सुनावणी होऊन राव, गोन्सालवीस, फरेरा, नवलाखा आणि भारद्वाज यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. पत्रकार गौतम नवलाखा यांनाही दिल्ली न्यायालयाने नजर कैदेत ठेवण्याचा आदेश दिला होता. याप्रकरणी अंतिम आदेशात सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या नजरकैदेत चार आठवड्यांची वाढ केली आहे. तसेच त्यांना अटक पूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्याची मूभा असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पहिल्यांदाच भारद्वाज यांनी पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. भारद्वाज यांच्या वतीने अॅड. युग चौधरी यांनी हा अर्ज दाखल केला आहे.
याप्रकरणात सर्वांत आधी अटक करण्यात आलेले अॅड. सुरेंद्र गडलींग, सुधीर ढवळे, रोना विल्सन, महेश राऊत आणि शोमा सेन यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असून त्यावर ६ आॅक्टोबरला सुनावणी होणार आहे.