माजल्यासारखं केल्यावर हक्कभंग समिती योग्य कारवाई करते- सुधीर मुनगंटीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 12:09 PM2023-05-18T12:09:46+5:302023-05-18T12:13:55+5:30
आज पुण्यात भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक होत आहे...
पुणे : खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यावर बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, "जेंव्हा एखादा व्यक्ती माजल्यासारखा करतो तसेच हक्कभंग समितीच्या चौकटीबाहेर जाऊन मी म्हणेल तेच धोरण असं वागते, तेंव्हा हक्कभंग समिती योग्य निर्णय घेऊन कारवाई करते. जर हक्कभंग सिद्ध झाला तर त्या व्यक्तीला जेलमध्येही जावे लागते." पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. आज पुण्यात भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक होत आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे?
राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाबद्दल आक्षेपार्ह शब्दप्रयोग केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात विधिमंडळात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. यासाठी भाजप आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली 15 सदस्यीय विधानसभा हक्कभंग समिती स्थापन करण्यात आली होती. राऊत यांच्या विरोधातील हक्कभंग प्रस्ताव अर्थसंकल्पीय अधिवेनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत मांडण्यात आला. त्यानंतर तो पुढील कारवाईसाठी असलेल्या राज्यसभेच्या अध्यक्षांकडे पाठवण्यात आला होता.