लठ्ठपणा सतावतोय? बॅरिऍट्रिक सर्जरी ठरतेय एक वरदान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 08:36 PM2021-06-10T20:36:53+5:302021-06-10T20:37:52+5:30

धावपळ, चुकीची जीवनशैली, फास्टफूड, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, वाढता ताण यांसारख्या कारणांनी लठ्ठपणाची समस्या सतावते आहे...

Suffering from obesity? Bariatric surgery is a boon | लठ्ठपणा सतावतोय? बॅरिऍट्रिक सर्जरी ठरतेय एक वरदान

लठ्ठपणा सतावतोय? बॅरिऍट्रिक सर्जरी ठरतेय एक वरदान

googlenewsNext

- डॉ. शशांक शहा

लठ्ठपणा ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे.  वजन वाढवणे एकवेळ जमू शकते, पण वाढलेले वजन कमी करणे हे एकप्रकारचे आव्हानच आहे. सध्याची धावपळ आणि चुकीची जीवनशैली, आहार, व्यायामाचा अभाव हे वजन वाढण्याचे मुख्य कारण असले, तरी फास्टफूडचे सेवन, प्रक्रिया करून पिकवलेले अन्न, अपुरी झोप, वाढता ताण यांसारख्या कारणांनी लठ्ठपणाची समस्या सतावते. आपले वजन वाढल्याने आपण बेढब दिसू लागलो म्हणून किंवा काहीतरी इंटरनेटवर पाहून तात्पुरते उपाय केले जातात पण ते म्हणावे तितके प्रभावी ठरतातच असे नाही. मुळात लठ्ठपणाकडे आजही आपल्याकडे एक प्रमुख आजार व समस्या म्हणून पाहिले जात नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.
बॅरिऍट्रिकची गरज काय ?
बरेचदा लठ्ठ माणसाला कमी कॅलरीज जेवण व व्यायाम वाढविण्यास सांगितले जाते. संतुलित आहार व व्यायामाचा फायदा निश्चितच होतो. पण काही व्यक्तींना त्याचा फायदा होत नाही, अशावेळी मेटाबॉलिजम वाढविणारी औषध द्यावी लागतात. त्यानंतरही फारसा फरक पडत नसल्यास त्याचे रूपांतर आजारात होते. अशावेळी बलून ट्रिटमेंट, बॅरिऍट्रिक सर्जरीचा अवलंब करावा लागतो. शरीरातील मेटाबॉलिजम बिघडला की वाढलेल्या फॅटची मेंदूला सवय होते. त्यामुळे या बिघडलेल्या मेटाबॉलिजमचा परिणाम इतर अवयवांवर व्हायला सुरुवात होते. अशावेळी हे असंतुलन नियमित करण्यासाठी जठर व आतड्यांमधून तयार होणारे चुकीचे संदेश नॉर्मल करून फॅट चे रुपांतर ऊर्जेत होऊन मेटाबॉलिजम नियमित होतो. त्यासाठी बॅरिऍट्रिक सर्जरीचा वापर होतो.
बॅरिऍट्रिक सर्जरीचे प्रकार :
फक्त जठरावर होणारी शस्त्रक्रिया : जठराचा गोलाकार भाग जेथे जास्तीत जास्त हार्मोन्स तयार होतात तो दुर्बिणीच्या माध्यमातून काढणे.
गॅस्ट्रिक बायपास : बायपास म्हणजे दुसरा समान रस्ता. जठराकडून आतड्याकडे जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता तयार केला जातो, ज्यामुळे फॅटचे शोषण कमी होते व भुकेचे प्रमाण मंदावते.
बॅरिऍट्रिक समज-गैरसमज
- कॅन्सर होऊ शकतो का?

या शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरची शक्यता कमी होते.
- शस्त्रक्रिया संपूर्ण पोट कापून म्हणजेच ओपन होते का?
दुर्बिणीच्या साह्याने जठरावर केली जाणारी ही शस्त्रक्रिया आहे.
- साईड इफेक्ट आहेत का?
कोणतीही शस्त्रक्रिया केल्यानंतर आपलं शरीर नॉर्मल होण्यासाठी काही कालावधी लागतोच. त्यासाठी योग्य संतुलित आहार, व्यायाम, आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करावाच लागतो. गेल्या ५० वर्षांपासून या शस्त्रक्रिया जगभरात होतात. योग्य आहार, पौष्टिक जेवण घेतले तर त्याचे रिझल्ट चांगलेच मिळतात.  
वजन कमी झाल्यास लठ्ठपणा आणि या सगळ्या आजारांवर खात्रीने कायमची मात करणं शक्य आहे. या शस्त्रक्रियेमुळे हृदयरोग, स्लीप अप्निया, टाइप-२ मधुमेह, उच्च रक्तदाब, फॅटी लिव्हर आणि ब्रेन स्ट्रोक यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो. याशिवाय सांध्यातील वेदना, संधीवात, पीसीओएस आणि लठ्ठपणाशी संबंधित बऱ्याच कर्करोगाचा धोका कमी होतो.
 

Web Title: Suffering from obesity? Bariatric surgery is a boon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.