कोरोनामुक्तीनंतरही वर्षभर शारीरिक दुखण्यांचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:09 AM2021-07-16T04:09:22+5:302021-07-16T04:09:22+5:30
पुणे : कोरोना बरा झाल्यानंतरही काही रुग्णांना श्वसनाशी संबंधित आजारांचा कायमस्वरुपी सामना करावा लागत आहे. फुप्फुसांची कार्यक्षमता कमी झाल्याने ...
पुणे : कोरोना बरा झाल्यानंतरही काही रुग्णांना श्वसनाशी संबंधित आजारांचा कायमस्वरुपी सामना करावा लागत आहे. फुप्फुसांची कार्यक्षमता कमी झाल्याने श्वास घेण्यास त्रास होणे, थकवा येणे, झोपेचे चक्र बदलणे, तीव्र अंगदुखी अशी कोरोना पश्चात (पोस्ट कोव्हिड) लक्षणे मोठ्या प्रमाणात कोरोनामुक्त नागरिकांमध्ये दिसत आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतरही काही रुग्णांना तीन महिन्यांपर्यंत ऑक्सिजनवर किंवा आयसीयूमध्ये ठेवावे लागत आहे. मात्र, ‘पोस्ट कोव्हिड’ त्रास वर्षभर मागे लागत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत संसर्गाचे प्रमाण खूप जास्त होते. बरेच ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाची तीव्र स्वरुपाची लक्षणे दिसून आली. काहींना महिन्याभराहून जास्त काळ ‘आयसीयू’मध्ये किंवा व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली. कोरोना संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही फुप्फुसांच्या कार्यक्षमप्त गुंतागुंत निर्माण झाल्याने ऑक्सिजन द्यावा लागला आणि उपचारही सुरु ठेवावे लागले. मात्र, काही रुग्णांमध्ये महिन्याभरात तर काही रुग्णांमध्ये तीनचार महिन्यांमध्ये सुधारणा दिसून आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठवल्याचे फुप्फुसविकारतज्ज्ञ डॉ. नितीन अभ्यंकर यांनी सांगितले.
चौकट
कोरोनाचे एकूण रूग्ण - ४ लाख ८२ हजार ९१६
बरे झालेले रूग्ण - ४ लाख ७१ हजार २०९
सध्या उपचार घेत असलेले रूग्ण - ३ हजार ३३
एकूण बळी - ८ हजार ६७४
चौकट
‘पोस्ट कोविड’चा जास्त धोका ज्येष्ठ-सहव्याधीग्रस्तांना
ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता जास्त असल्याचे दिसून आले. उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनीचे आजार असलेल्या रुग्णांच्या शरीराची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे त्यांना विषाणूजन्य आजारांची लागण मोठ्या प्रमाणात होते. मुख्यत:, सातत्याने थकवा येणे, श्वास घेताना दम लागणे, खोकला होणे, तीव्र अशक्तपणा, अतिवेदना, अंगदुखी, थकवा, डोकेदुखी अशी लक्षणे बऱ्याच काळापर्यंत दिसून येतात.
चौकट
“तीव्र कोरोना होऊन गेला असेल तर फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होते. यामुळे ‘पोस्ट कोव्हिड’ त्रास जाणवू शकतो. मात्र, ८०-९० टक्के रुग्णांमध्ये चार-पाच महिन्यांमध्ये पोस्ट कोव्हिड त्रास कमी होत जातो. १०-२० टक्के रुग्णांना जास्तीत जास्त एक वर्ष त्रास होऊ शकतो. अशा रुग्णांना एक-दोन महिने रक्त पातळ होण्याच्या गोळ्या दिल्या जातात. लंग फायब्रोसिस, फुफुसांना सूज येणे, ऑक्सिजनचा पुरवठा कमी होणे, रात्री झोप न लागणे आणि दिवसा झोप येण्याचा त्रास जाणवतो. काही रुग्णांना अचानक ‘हार्ट अॅटॅक’ येण्याची उदाहरणेही आहेत. काहींमध्ये न्युमोथोरॅस अर्थात फुप्फुसातील हवा बाहेर पडण्याची गुंतागुंत निर्माण होते, ऑक्सिजनची गरज भासते. काही रुग्णांना कोरोनातून बरे झाल्यावर दोन-तीन महिने रुग्णालयात देखरेखीखाली ठेवावे लागते. मात्र, वर्षभराहून जास्त काळ ‘पोस्ट कोव्हिड’चा त्रास होत नसल्याचे दिसून आले आहे.”
- डॉ. नितीन अभ्यंकर, फुप्फुसरोगतज्ज्ञ
चौकट
कोरोनातून बरे झाल्यानंतरही घ्या काळजी
* कोरोनातून बरे झाल्यावरही श्वसनाचे व्यायाम कायम ठेवावेत.
* हलका आणि सकस आहार घ्यावा.
* हलक्या स्वरुपाचे व्यायाम नियमितपणे सुरु ठेवावेत.
* कोणत्याही त्रासाकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांशी संपर्क साधावा.
* औषधोपचार नियमितपणे घ्यावेत