फिर्यादींना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
By admin | Published: May 29, 2017 01:57 AM2017-05-29T01:57:57+5:302017-05-29T01:57:57+5:30
पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदविण्यासाठी आलेल्या दोन गटांत मारामारी झाल्याने फिर्यादींना पोलिसांनी कोठडीत घेऊन रक्तबंबाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
वडगाव निंबाळकर : पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदविण्यासाठी आलेल्या दोन गटांत मारामारी झाल्याने फिर्यादींना पोलिसांनी कोठडीत घेऊन रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्याचा प्रकार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये शनिवारी (दि. २७) रात्री घडला. या प्रकारानंतर काही काळ तणावाचे वातावरण झाले होते.
कोऱ्हाळे खुर्द येथे शनिवारी दोन गटांत जोरदार मारामारीची घटना घडली. याबाबत तक्रारी देण्यासाठी दोन्ही गटांचे लोक आले असता पुन्हा ठाण्यात मारामारी झाली.
या वेळी आरोपींची पिक-अप जीप रस्त्यातच लावण्यात आलेली होती. ती बाजूला घेण्यास सांगितले. त्यावरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करीत हातात तलवारी घेऊन दहशत निर्माण केली. फिर्यादीचे चुलते शिवाजी शंकर खोमणे यांनाही शिवीगाळ करून धमकावण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
भाऊसाहेब गावडे यांनी फिर्यादीनुसार शिवाजी खोमणे, अनिल खोमणे, नीतेश खोमणे, नाना खोमणे, सागर खोमणे, संदीप खोमणे या ६ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीच्या गोठ्याजवळील रस्त्यावर अक्षय खोमणे याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर फिर्यादीच्या पिक-अप (एमएच-११/टी-४८७) ला घासून नेला. या घटनेत फिर्यादीचे बोकड ट्रॅक्टरखाली मारले गेले. त्याचा जाब विचारला असता अक्षय याने हमीद पवार याला शिवीगाळ, मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या कुटुंबातील एकाला वरील आरोपींनी टॉमीने मारहाण केली. हातात लोखंडी गज, कोयता, तलवार अशी हत्यारे घेऊन दहशत माजविल्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दोन्ही गट तक्रार देण्यासाठी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात आले असताना पोलीस ठाण्याच्या आवारातच त्यांच्यात जोरदार मारामारी झाली. शांततेचा भंग केल्याप्रकरणी पोलीस गौतम लोकरे यांनी फिर्याद दाखल केली.
यावरून अक्षय खोमणे, शिवाजी खोमणे, नानासोा खोमणे, अनिल खोमणे, सागर खोमणे यांच्यासह दुसऱ्या गटाचे भाऊसोा गावडे, शिवाजी गावडे, संताजी गावडे, राजेंद्र गावडे, बन्सीलाल गावडे, नितीन गावडे, हमीद पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्याच्या आवारात एकमेकांकडे बघून हाताने, काठीने मारहाण करीत असताना पोलिसांना ते मिळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही गटातील आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता अनिल, अक्षय, नानासाहेब यांनी फिर्याद देण्यासाठी गेलो असता पोलीस कर्मचाऱ्यांनी कोठडीत घेऊन बेदम मारहाण केल्याचे सांगितले, ठाण्यामधील कॅमेऱ्यामध्ये चित्रीकरण तपासावे. तक्रार देण्यासाठी जाताना जखमा नव्हत्या, तर बाहेर येताना डोक्याला मारहाणीच्या जखमा आहेत, असे न्यायालयासमोर सांगितले. तातडीने तिघांची वैद्यकीय तपासणी करून न्यायालयाकडे अहवाल दिला.
दोन्ही गटांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल
याप्रकरणी दोन्ही गटांच्या परस्परविरोधी फिर्यादी दाखल करीत गुन्हे दाखल केले आहेत. अक्षय खोमणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हमीद पवार, भाऊसाहेब गावडे, राजेंद्र गावडे, शिवेंद्र गावडे, सुजित गावडे या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर (एमएच ४२, वाय ७८२७) मध्ये जनावरांना चारा घेऊन कोऱ्हाळे खुर्द ते लिफ्टवस्ती रस्त्याने जात होते.