खडकवासल्यासह इतर धरणांमध्ये पुण्याला वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 09:16 PM2018-07-14T21:16:45+5:302018-07-14T21:19:28+5:30
खडकवासला,टेमघर ,पानशेत व वरसगाव या धरणांमध्ये शनिवारी सकाळी १४.२५ टीएमसी पाणीसाठा होता. शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्यात १४.७३ टीएमसीपर्यंत वाढ झाली.
पुणे: गेल्या दोन आठवड्यापासून पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पडणा-या पावसामुळे खडकवासला धरण साखळीतील पाण्यात सुमारे १५ टीएमसीपर्यंत वाढ झाली आहे. दोन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी खडकवासला धरण ८१.४३ टक्के भरले असून पानशेत धरण ६५.८९ टक्के भरले आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत खडकवासला धरणसाखळीतील धरणांमध्ये १४.७३ टीएमसी पाणीसाठा झाला होता. पुण्याची पाण्याची वर्षभराची गरज १४ टीएमसी आहे.
पुणे जिल्ह्यातील शेतक-यांच्या शेतीला आणि पुणे शहराला पाणी पुरवठा करणा-या जिल्ह्यातील धरण क्षेत्रात गेल्या दहा दिवसांहून अधिक कालावधीपासून मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आहे. त्यामुळे सुमारे १० ते १२ तासात धरणांमध्ये अर्धा टीएमसीपर्यंत पाणीसाठा वाढत आहे.खडकवासला,टेमघर ,पानशेत व वरसगाव या धरणांमध्ये शनिवारी सकाळी १४.२५ टीएमसी पाणीसाठा होता. शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्यात १४.७३ टीएमसीपर्यंत वाढ झाली.
जून महिना उलटून गेला तरी पुण्यात जोरदार पावसाने हजेरी लावली नव्हती. परिणामी पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. शहराला १५आॅगस्टपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा धरणात आहे,असे सिंचन विभागाच्या अधिका-यांकडून सांगितले जात होते. शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरणसाखळीत १जुलै रोजी केवळ ३.४८ टीएमसी पाणीसाठा होता. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून धरणसाठ्यात काही प्रमाणात वाढ होऊ लागली. १४ जुलै रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत धरणसाठ्यात १४.२५ टीएमसीपर्यंत वाढ झाली.त्यामुळे गेल्या १४ दिवसांत धरणसाठ्यात १०.७७ टीएमसीपर्यंत वाढ झाली.
दरम्यान, शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला धरण ८१.४३ टक्के,वरसगाव धरण ३६.४९ टक्के,पानशेत धरण ६५.८९ टक्के तर टेमघर धरण ३८.४४ टक्के भरले आहे.गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी धरणक्षेत्रात ४० ते ६० मि.मी.पाऊस होत होता. मात्र,गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असून धरण क्षेत्रात ५ ते २५ मि.मी.पर्यंत पाऊस कमी झाला आहे.
शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला धरणात १.६० टीएमसी,पानशेत धरणात ७.०२ टीएमसी,वरसगाव धरणात ४.६८ टीएमसी तर टेमघरमध्ये १.४३ टीएमसी एवढा पाणीसाठा होता,असे सिंचन भवनातील अधिका-यांनी सांगितले.