मकर संक्राती निमित्त सुगडी पुजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:13 AM2021-01-16T04:13:57+5:302021-01-16T04:13:57+5:30
पानशेत : सिंहगड आणि परिसरात गुरूवारी मकर संक्रात सण महिलांनी पारंपरिक पद्धतीने साजरा केला. खडकवासला, डोणजे,खानापूर ,गोऱ्हे खु, ...
पानशेत : सिंहगड आणि परिसरात गुरूवारी मकर संक्रात सण महिलांनी पारंपरिक पद्धतीने साजरा केला.
खडकवासला, डोणजे,खानापूर ,गोऱ्हे खु, गोऱ्हे बु,खामगाव मावळ, मालखेड ,वरदाडे, निगडे मोसे, ओसाडे, रूळे, आंबी, सांगरूण, बहुली, जाभली येथील मंदिरात सुगडी पूजनासाठी महिलांनी गर्दी केली होती. हळदी-कुंकवाने सणाला प्रारंभ करण्यात आला. 'तिळगूळ घ्या गोड गोड बोला' म्हणत तिळगुळाचे वाटप करण्यात आले. यंदा मकरसंक्रात एक दिवस उशिरा साजरी करण्यात आली. पण सणातील पारंपरिक उत्साह कायम होता. महिलांनी घरासमोर व मंदिरासमोर रांगोळी काढली. पाच सुगडीत गव्हाचे ओंबे, ज्वारींची कणस, तिळगूळ, गाजर, ऊस, हरभरा टाकून फुलांनी सूप सजवले होते. हे सूप घेऊन महिलांनी मंदिरात सुगडी-सुपाचे पूजन केले. मंदिरात मूर्तीसमोरमोठ्या आनंदात एकमेकींना हळदी-कुंकू लावले. सुगडी, वाण एकमेकींना देऊन संक्रातीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. महिलांनी मंदिरांत उपस्थित ज्येष्ठ महिलांचे आशीर्वाद घेतले. मंदिरातील तुळशीसमोर व मूर्तीसमोर एक एक सुगडी ठेवून पूजन केले. यातच काही महिलांनी मंदिरात उखाणे घेऊन पारंपरिकता जपली. घराघरांतही आनंदात कुटुंबीयांसमवेत सक्रांत साजरी केली. तिळगूळ, तिळाचे लाडू, तिळाची चिक्की अशा विविध पाककृतींनी मित्रपरिवार, कुटुंबीयांत मकरसंक्रात साजरी केली. संक्रातीचे खास आकर्षण असणारे पतंग उडवण्याचा आनंद अनेकांनी घेतला.
सिंहगड-पानशेत परिसरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . शहरी व ग्रामीण भागात सुवासिनी स्त्रियांनी घराजवळ असणार्या देव -देवतांच्या मंदिरांत सुगडदान करण्यासाठी गर्दी केली होती . ज्या कुटुंबात मुलीचे लग्न झाल्यावर पहिले वर्ष आहे, त्यांच्या सासरहून त्या मुलीला साडी व ह्यववसा ह्य आल्याचे दिसत होते. ( ववसा म्हणजे ऊस , गाजर ,हरबरा , बोरे ,गव्हाच्या ओंब्या , व तिळगुळ आदी.) भावकीतील व आळीतील सुवासिनी स्त्रियांना ववसा पाहण्यासाठी बोलावण्याची स्त्रियांची लगबग जाणवत होती. तसेच ज्या कुटुंबातील मुलाचे लग्न झाल्यावर पहिले वर्ष आहे, त्यांच्या घरी सबंधित मुलीकडे साडी व ववसा पाठविण्याची लगबग दिसत होती. मकर संक्रांत हा स्नेह वाढविणारा सण असल्याने व परंपरेने सुवासिनी स्त्रियांनी हळदी कुंकू , तिळगुळ व नित्योपयोगी वस्तू एकमेकींना भेट म्हणून दिल्या . लहान मुले व पुरुष मंडळींही आपल्या मित्र -मैत्रिणींना तिळगुळ देत तिळगुळ घ्या, गोड बोला असे आवर्जून सांगत होते. मकर संक्रांतीला तिळाचे महत्व विशेष असून तिळाच्या अंगी जशी स्निग्धता आहे, तशी स्निग्धता स्नेह रूपाने आपल्या मित्र मंडळींमध्ये निर्माण व्हावी अशी यामागे प्रत्येकाची भावना दिसुन आली .