दिवाळीनंतर सुरू होणार गळीत हंगाम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 01:06 PM2019-10-11T13:06:12+5:302019-10-11T13:11:53+5:30

चाऱ्यासाठी तुटलेला ऊस, लांबलेल्या पावसाचा गळीत हंगामावर परिणाम

sugar cane factory season begins after Diwali | दिवाळीनंतर सुरू होणार गळीत हंगाम

दिवाळीनंतर सुरू होणार गळीत हंगाम

Next
ठळक मुद्देराज्य शासनाकडून १ नोव्हेंबर निश्चित :इंदापूर तालुक्यातील तीनही साखर कारखाने दर वर्षी दिवाळीत सुरू होणार

सोमेश्वरनगर : राज्य शासनाने यावर्षी साखर कारखानदारीचा ऊस गळीत हंगाम सुरू करण्यासाठी १ नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली आहे. या निर्णयामुळे आता दिवाळी संपल्यानंतरच, ऊस गाळप हंगाम सुरू होण्याची चिन्हे आहेत. मात्र, यंदा ऊस गाळपाचे आव्हान पूर्ण करताना कारखाना व्यवस्थापनाची दमछाक होणार आहे. चाऱ्यासाठी तुटून गेलेला ऊस आणि लांबलेल्या पावसाचा गळीत हंगामावर परिणाम होण्याची अधिक शक्यता आहे.
 दरवर्षी दसऱ्यालाच जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचे बॉयलर पेटतात. यावर्षी मात्र दसरा संपला, तरी बहुतांश कारखान्यांचा बॉयलर पेटला नाही.

दरवर्षी कारखाने उशिरा सुरू करायला नेहमीच कारखान्यांचा विरोध राहिलेला आहे; मात्र यावर्षी दुष्काळामुळे; तसेच चारा छावण्यांना ऊस तुटल्यामुळे करखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस घटला आहे. परिणामी, कारखान्यांचे गाळप कमी होणार आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर आणि माळेगाव हे दोन्ही कारखाने गाळपासाठी सज्ज झाले असून, दोन्ही ही कारखान्याने ऊसतोडणी कामगार, वाहतूकदार आणि गेटकेन ऊसधारक यांच्याशी करार पूर्ण केले आहेत. माळेगाव कारखान्याचा बॉयलर पेटला असून, येत्या काही दिवसांत सोमेश्वर कारखान्यांचा बॉयलर पेटणार आहे. 
यंदाच्या हंगामात माळेगाव कारखान्याकडे ६ लाख मे. टन ऊस उपलब्ध आहे. ४ लाख ५० हजार मेट्रिक टन उसाचे गेटकेनधारकांचे करार केले आहेत, तर भीमा-पाटस कारखान्याचा जवळपास १ लाख ५० हजार मेट्रिक टन ऊस माळेगाव कारखान्याची यंत्रणा आणणार आहे.  माळेगावने ११ ते १२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तोडणी, वाहतूक यंत्रणा सज्ज असून, यामध्ये १०० ट्रक, ३०० ट्रॅक्टर, १००० बैलगाड्या, ८०० ट्रॅक्टरचे करार  केले आहेत.  कारखान्याने विस्तारीकरणानंतर प्रथमच मागील गाळप हंगामात १० लाख ७२ हजार ५१९ मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. येणाºया गाळप हंगामाची किरकोळ कामे वगळता, सर्व पूर्व तयारी झाली आहे. 
....
या गळीत हंगामात सोमेश्वर कारखान्याकडे २६ हजार ९०० एकर उसाचे क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध असून, सभासदांचा ८ लाख ५० हजार मेट्रिक टन, तर गेटकेनधारकांचा १ लाख २५ हजार मे. टन असे साडेनऊ ते दहा लाख टन ऊसगाळपाचे सोमेश्वरचे उद्दिष्ट आहे. 

गेटकेन ऊसधारकांशी करार झाले आहेत. कारखान्यातील अंतर्गत कामे अंतिम टप्प्यात आहेत; तसेच १ हजार बैलगाडी व ३५० ट्रक- टॅक्टरशी करार पूर्ण झाले असून, त्यांना कराराची पहिली उचलही देण्यात आली आहे. 

दुष्काळामुळे कार्यक्षेत्रातील ऊस कमी झाला असला, तरी परतीच्या पावसामुळे उसाच्या टनेजमध्ये वाढ होणार आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत बॉयलर पेटणार आहे. १ नोव्हेंबरच्या गाळप हंगामासाठी कारखाना सज्ज झाला असल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली.
........
 

दिवाळीनंतरच साखर कारखान्याची धुराडी पेटणार
जंक्शन  : इंदापूर तालुक्यातील तीनही साखर कारखाने दर वर्षी दिवाळीत सुरू होऊन, मे महिन्यात पट्टा पडत असे; परंतु यावर्षी उसाचे क्षेत्र पाण्याची तीव्र टंचाई व  दुष्काळात तेरावा महिना म्हणजे निवडणूक आल्या असल्याने तब्बल दोन महिने उशिरा म्हणजे, दिवाळीनंतरच धुराडी पेटणार आहेत.  
दुष्काळामुळे ऊस पिकांना फटका बसला आहे. गाळपायोग्य नसल्याने उशिरा गाळप हंगामास सुरुवात करण्याच्या हालचाली असल्याचे नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार यांनी माहिती दिली. इंदापूर तालुक्यातील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या गाळप क्षमता जवळजवळ २ लाख टन आहे. शंकरराव बाजीराव सहकारी साखर कारखान्यातील गाळप क्षमता जवळजवळ ९ लाख टन आहे. त्यात तालुक्यातील जनावरांचा चारा यासाठी २५ टक्के ऊस वापरण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक कारखान्याच्या वाट्याला किती ऊस येणार, यावर गाळपाचे प्रमाण ठरणार आहे. मात्र, दरवर्षीपेक्षा यावर्षी गाळप कमी होण्याची चिन्हे आहेत.
........

Web Title: sugar cane factory season begins after Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.