ऊसतोडणी मजुरांना अतिसार

By admin | Published: December 1, 2015 03:33 AM2015-12-01T03:33:48+5:302015-12-01T03:33:48+5:30

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडणी मजुरांना पिण्याचे दूषित पाणी प्यायल्याने रविवारी सायंकाळनंतर जुलाब-उलट्यांचा त्रास सुरू झाला

Sugar Equilibrium Diarrhea | ऊसतोडणी मजुरांना अतिसार

ऊसतोडणी मजुरांना अतिसार

Next

अवसरी : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडणी मजुरांना पिण्याचे दूषित पाणी प्यायल्याने रविवारी सायंकाळनंतर जुलाब-उलट्यांचा त्रास सुरू झाला. २५ मजुरांवर पारगाव व मंचर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करून औषधोपचार सुरू करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे ५०० मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचा दावा वैद्यकीय सूत्रांनी केला आहे.
आंबेगाव तालुक्यातील या कारखान्याच्या परिसरात ऊसतोडणी मजुरांची तात्पुरती वस्ती आहे. सध्या हंगाम सुरू असल्याने पाचशे ते सहाशे कामगार या भागात सहकुटुंब आहेत. जवळूनच वाहणाऱ्या घोड नदीचे पाणी पाईपलाईनने आणून व तेथे असलेल्या बोअरवेलचे पाणी हे मजूर वापरतात.
कारखान्याच्या परिसरात घाण असते. अवकाळी पावसाचे घाण पाणी बोअरमध्ये झिरपून मजुरांना त्रास झाला असावा, असा अंदाज आहे. काल सायंकाळी पाचनंतर काही ऊसतोडणी मजुरांना जुलाब-उलट्या होऊ लागल्या. त्रास होणाऱ्यांची संख्या वाढत गेली. ही माहिती समजल्यावर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीने धामणी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मंचर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथक बोलावले.दिवसभर उलट्या-जुलाब झालेल्या मजुरांपैकी ज्यांची स्थिती गंभीर होती, त्यांना अ‍ॅम्ब्युलन्सने धामणी व मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, सलाईन लावून प्रतिबंधात्मक औषधे देण्यात आली.
काही जणांना घरी सोडण्यात आले. कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, संचालक प्रदीप वळसे-पाटील यांनी बहुतांश मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय घेतला.
कारखाना परिसरातील वस्तीत जाऊन सर्वच मजुरांना प्रतिबंधात्मक गोळ्या व औषधे देण्यात आली. मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ऊसतोडणी मजुरांवर वैद्यकीय उपचार चालू आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी भेट देऊन मजुरांच्या प्रकृतीची चौकशी केली.
दरम्यान, मोठ्या प्रमाणात दुर्घटना होऊनही या घटनेची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली; त्यामुळे रुग्णांची नावे समजू शकली नाहीत. (वार्ताहर)

शुद्धीकरण प्रकल्प सुरू करू
पिण्याचे पाणी दूषित प्यायल्यामुळे जुलाब-उलट्या झाल्या आहेत. ऊसतोडणी मजूर आणि ग्रामस्थ, ऊसउत्पादक शेतकरी यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी कारखान्याने सुमारे २० ते २२ लाख रुपये खर्च करून शुद्धीकरण यंत्रणा उभारली आहे. परंतु, काही तांत्रिक अडचणीमुळे प्रकल्प कार्यान्वित केलेला नव्हता. येत्या दोन दिवसांत पाणी शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित केला जाईल, अशी माहिती बेंडे, वळसे-पाटील यांनी दिली.

Web Title: Sugar Equilibrium Diarrhea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.