साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले
By admin | Published: October 16, 2015 10:31 PM2015-10-16T22:31:43+5:302015-10-16T22:31:43+5:30
राज्यातील ऊस गळीत हंगामाला अखेर १५ आॅक्टोबरपासून सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी २० ते २५ साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले आहे
पुणे : राज्यातील ऊस गळीत हंगामाला अखेर १५ आॅक्टोबरपासून सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी २० ते २५ साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले आहे. यामध्ये यंदा साखर आयुक्त कार्यालयाकडे केवळ ५० साखर कारखान्यांनी गाळप परवाण्यासाठी प्रस्ताव दिले आहेत. त्या कारखान्यांच्या क्षेत्रांत उपलब्ध असलेला ऊस विचारात घेऊन व प्रस्तावाची पडताळणी करून ऊस गाळपाला परवानगी दिली जाणार आहे.
राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऊसाच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. त्यामुळे अनेक साखर कारखान्यांना गाळप हंगामासाठी ऊस उपलब्ध नसल्याने त्यांचे बॉयलर पेटतील किंवा नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. परंतु, राज्याच्या ऊस गाळप हंगामाबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत धोरण निश्चित करण्यात आले असून, १५ आॅक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात पहिल्या दिवशी २० ते २५ साखर कारखान्यांनी बॉयलर पेटवले. प्रादेशिक स्तरावर १७२ कारखान्यांनी ऊस गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत. त्यांची छाननी होऊन त्यातील ५० कारखान्यांचे प्रस्ताव साखर आयुक्त कार्यालयात अंतिम मान्यतेसाठी सादर झाले आहेत.
यावेळी प्रथमच ऊस गाळप परवाना देताना संबंधित साखर कारखान्याने गेल्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसदराची एफआरपीची ७५ टक्के रक्कम देणे बंधनकारक आहे. गेल्या हंगामातील संपूर्ण जमाखर्चाला मान्यता घेणे बंधनकारक आहे.
या सर्व बाबींची पडताळणी करून परवाना दिला जातो. या सर्व बाबींची पडताळणी करून परवाना दिला जातो. साखर आयुक्त कार्यालयाने अद्याप एकही गाळप परवाना दिलेला नाही. साखर कारखान्यांनी सध्या त्यांचे बॉयलर पेटविले आहेत.
देशात अन्यत्र पावसाने फटका दिल्याने साखर उत्पादन घटणार असल्याचा अंदाज आहे.
>>राज्यात दुष्काळामुळे मराठवाडा, सोलापूर आणि नगर जिल्ह्णांत उसाची उपलब्धता खूपच कमी आहे. त्यामुळे या काही जिल्ह्णाच्या गाळप हंगामाचे स्वतंत्रपणे नियोजन सुरू असून, याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे साखर आयुक्त कार्यालयातील अधिकृत सूत्रांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रात पुरेसा ऊस उपलब्ध असल्याने ऊस उत्पादनावर मोठा परिणाम होणार नाही.
>>साखर उद्योगाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, परवानगी मिळाल्यानंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर या बॉयलरमध्ये मुळी टाकून गाळप सुरू होण्याची शक्यता आहे. राज्यात यंदा सुमारे ७०० ते ७५० लाख मेट्रिक टन ऊस उत्पादनाचा अंदाज आहे.