पूरक पोषण आहारात तेलाऐवजी आता साखर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:08 AM2021-06-03T04:08:11+5:302021-06-03T04:08:11+5:30
खाद्यतेलाचे भाव भिडले गगनाला : योजनेतील लाभार्थ्यांना बसतोय आर्थिक फटका (स्टार ७७१ डमी) पुणे : खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडल्याने ...
खाद्यतेलाचे भाव भिडले गगनाला : योजनेतील लाभार्थ्यांना बसतोय आर्थिक फटका
(स्टार ७७१ डमी)
पुणे : खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडल्याने शासनाने पूरक पोषण आहारात देण्यात येणारे तेल बंद केले आहे. या योजनेतील १ लाख ८० हजार ५९६ लाभार्थी अल्प उत्पन्न गटातील आहेत. त्यामुळे याचा मोठा आर्थिक फटका त्यांना बसत आहे. केवळ कडधान्य घेऊन करायचे काय, त्याला फोडणी कशी द्यायची, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील लाभार्थ्यांना पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत कडधान्य देण्यात येते. यामध्ये सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील १ लाख ३७ हजार ८११ तर गरोदर महिला आणि स्तनदा माताचे ४२ हजार ७८५ लाभार्थी आहेत. योजनेतील एकूण १ लाख ८० हजार ५९६ लाभार्थ्यांना आर्थिक झळ बसत आहे. त्यामुळे शासनाने याचा विचार करून या योजनेत पुन्हा खाद्यतेल देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.
---
* पूरक पोषण आहार योजना...
- एकूण लाभार्थी :- १,८०,५९६
- सहा महिने ते ३ वर्षे वयोगटातील लाभार्थी :- १,३७,८११
- गरोदर महिला आणि स्तनदा माता :- ४२,७८५
----
पूरक पोषण आहारात काय काय मिळते ?
गहू, मसूर डाळ, मूग डाळ, मिरची, हळद, मीठ, साखर, चना आणि मटकी आदी वस्तू या पूरक पोषण आहारात देण्यात येत आहेत.
-----
अधिकारी कोट
पूरक पोषण आहार मुख्यतः कच्चे धान्य स्वरूपात मिळत आहे. त्यामुळे त्याचा पूर्ण वापर होत आहे. अशा स्वरूपाचा आहार मिळावा, अशी महिला लाभार्थी आणि पालकांची मागणी आहे.
- दत्तात्रय मुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग, पुणे जिल्हा परिषद
----
फोडणी कशी द्यायची ?
कोट
१) पूरक पोषण आहारात फक्त कडधान्य मिळत आहे. पूर्वी तेलही मिळत होते. मात्र खाद्यतेलाचे भाव वाढल्याने तेल बंद केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, तेलाशिवाय फोडणी कशी द्यायची, असा प्रश्न पडला आहे.
- संगीता कदम, लाभार्थी महिला
----
२) केवळ कच्चे धान्य मिळत आहे. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी तेल आवश्यक आहे. त्यामुळे महिला व बाल कल्याण विभागाने याचा गांभीर्याने विचार करावा.
- सोनल ढवळे, लाभार्थी महिला
---
३) खाद्यतेलाचे भाव वाढल्याने ते देणे शासनाला परवडत नसेल तर मग आम्हाला कसे परवडणार आहे. जिल्ह्यात या योजनेतील लाभार्थी हे अल्प उत्पन्न गटातील आहेत. त्यामुळे शासनाने याचा विचार करून तेल देण्याची व्यवस्था करावी.
- गजानन हरगुडे, लाभार्थी पालक